Latest

‘तिन्ही सैन्य दलांना सतर्कतेच्या सूचना’

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  नव्या आणि भविष्यातील संकटांच्या मुकाबल्यासाठी सैन्य दलाच्या तिन्ही शाखांनी सज्ज राहावे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्या. सरकार सैन्य दलाला अत्यावश्यक आधुनिक हत्यारे आणि तंत्रज्ञान पुरवण्यासाठी सर्व ती पावले उचलत असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

भोपाळ येथे तीन दिवस चाललेल्या सैन्य दल कमांडर परिषदेच्या समारोपाच्या दिवशी सैन्य दल प्रमुखांशी चर्चा करताना ते बोलत होते. मागील तीन वर्षांपासून चीन सीमेवर असलेला तणाव आणि पाकिस्तानसोबतचे ताणले गेलेले संबंध या पार्श्वभूमीवर दर दोन वर्षांनी होणारी कमांडर परिषद महत्त्वाची मानली जाते. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांकडून संरक्षणविषयक माहिती घेत अनेक बाबींवर चर्चा केली. पंतप्रधान म्हणाले की, सैन्य दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारने प्राधान्य दिलेले आहे. सैन्य दलांना आवश्यक असणारी आधुनिक शस्त्रसामग्री व तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी सरकार सर्व ती पावले उचलत आहे. भूराजकीय परिस्थितीचा विचार करता नवीन आणि भविष्यातील संकटांचा मुकाबला करण्यासाठी लष्कर, नौदल व हवाई दलाने सज्ज राहण्याची गरज आहे.

भारतीय सैन्याच्या कामगिरीचा गौरव करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, राष्ट्र उभारणी, मानवतेच्या भूमिकेतून केलेली मदत आणि मित्र देशांत आपत्ती निवारणात सैन्य दलांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. संरक्षण मंत्रालयाने बैठकीबाबत माहिती दिली की, या परिषदेत जनरल अनिल चौहान यांनी पंतप्रधानांना ब्रीफिंग केले. परिषदेत झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली.

बैठकीत चीनच्या कारवायांवर चर्चा

मागील काही महिन्यांपासून चीनने भारताच्या सीमेवर तिन्ही बाजूंनी कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. लडाख सीमेवर वाढवण्यात आलेले चिनी सैन्यबळ तसेच भारत सीमेनजीक सुरू केलेले बांधकाम आणि आता कच्छच्या सीमेनजीक पाकिस्तानात उभारण्यात येणारे वीज निर्मिती प्रकल्प ही ताजी उदाहरणे आहेत. त्या पार्श्वभूमीवर भोपाळमध्ये झालेली कमांडर परिषद महत्त्वाची आहे. या बैठकीत पंतप्रधानांनी तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांकडून अधिक माहिती घेतली व त्यांना महत्त्वपूर्ण सूचनाही दिल्या.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT