Latest

तासगाव-भिलवडी रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत दोन ठार, एक जखमी

Arun Patil

तासगाव ; पुढारी वृत्तसेवा : तासगाव-भिलवडी रस्त्यावर एका ढाब्यासमोर उभ्या असलेल्या तिघांना छोटा हत्ती टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातात सांगली जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल नारायण शिंदे (रा. शिवाजीनगर, तासगाव) आणि दीपक ऊर्फ शिवाप्पा शिदलिंग स्वामी (रा. नाट्यगृहाजवळ, तासगाव) हे दोघे ठार झाले. तर सचिन दत्तात्रय बाबर (रा. शिक्षक कॉलनी, तासगाव) जखमी झाले आहेत. रविवारी रात्री साडेअकरा वाजता हा अपघात घडला.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : शिंदे, स्वामी व बाबर हे तासगाव-भिलवडी रस्त्यावर एका ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरा जेवण करून ते ढाब्याच्या बाहेर रस्त्याकडेला बोलत थांबले होते. भिलवडीकडून आलेल्या छोटाहत्ती (एम. एच. 10 बी. आर- 5204) या वाहनाने या तिघांना जोराची धडक दिली.

हे तिघे रस्त्यावर जोरात आपटले. तिघांच्या डोक्याला जबर मार लागला होता. या अपघातात शिंदे व स्वामी हे जागीच ठार झाले. बाबर हे गंभीर जखमी झाले. त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असून ते औषधोपचाराला प्रतिसाद देत असल्याचे त्याच्यावर उपचार करणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

शिंदे हे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून अतिशय आक्रमक पद्धतीने काम करीत होते. शहरातील अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले होते. नुकताच त्यांनी शहरातील कस्तुरबाई रुग्णालय हे मिरज वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरण करावे यासाठी उपोषण केले होते.तासगावला वाली कोण, असा फलक घेऊन ते येथील बाजार समितीच्या प्रवेशद्वारात असणार्‍या स्व.आर.आर. पाटील यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषणाला बसले होते. आक्रमकपणे बाजू मांडून कस्तुरबाई रुग्णालयाचा विषय ताणून धरला होता. स्वामी हे पालिकेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते.जखमी बाबर हे उत्कृष्ट खेळाडू आहेत.

SCROLL FOR NEXT