Latest

तर मी पहाटेच येऊन पहाणी करेन : अजित पवार

रणजित गायकवाड

बारामतीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात काही सुधारणा गरजेच्या आहेत. मी पाहणी करताना या बारीक-सारीक बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्या सुधारून घ्या. मला काय मी रात्री-अपरात्री किंवा पहाटे पाचलाच येवून पाहणी करेल, मला सवय आहे. रात्रीचे डाॅक्टर्स, नर्सेस जागे असले पाहिजेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात रविवारी (दि. १०) कानपिचक्या दिल्या.

शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात बसवण्यात आलेल्या सिटी स्कॅन मशिनचे उदघाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोना अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सगळ्यांनीच काळजी घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाने मास्क वापरावा. मी फक्त जेवण करताना व पाणी पितानाच मास्क काढतो. माझे अनुकरण तुम्ही करा, असे सांगून पवार म्हणाले, कोरोना वाढला की विकासकामांना कात्री लागते. तो निधी उपाययोजनांवर खर्च करावा लागतो. शेवटी माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. स्वांत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सलग ७५ तास काही ठिकाणी लसीकरण केले जात आहे. प्रत्येकाने लस घ्यावी, असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले.

बाप्पा लोकांवर लक्ष ठेव

मंदिरे उघडली आहेत. श्रद्धेशी निगडीत ही बाब आहे. मी सुद्धा सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. बाप्पा माझ्याकडे नको, लोकांवर लक्ष ठेव अशी प्रार्थना केली. कोरोनाची तिसरी लाट येवू नये, असे साकडे घातल्याचे पवार म्हणताच हास्यकल्लोळ उडाला. आयकर विभागाच्या छाप्यानंतर पवारांनी केलेल्या या वक्तव्याला महत्त प्राप्त झाले आहे.

व्यसनांपासून दूर रहा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी उपस्थितांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. गुटखा खावू नका, दारु पिवू नका, नायतर रोज टाकणार आणि म्हणणार बघा, अशा शब्दात तळीरामांची त्यांनी हजेरी घेतली. आरोग्यदायी जीवनशैली अंगिकारा, सकाळी लवकर उठा, व्यसनं करालं तर बरबाद व्हाल, असे ते म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT