Latest

तब्बल 20 हजार पुरणपोळी अन् 2 हजार लिटर आमटी; पालखी सोहळ्यातील महाप्रसाद

अमृता चौगुले

मांडवगण फराटा : पुढारी वृत्तसेवा

शिरूर तालुक्याच्या पूर्व भागात आलेल्या बाळूमामांच्या पालखीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केले जात असून, मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे दहा ते बारा हजार भाविकांसाठी पुरणपोळी-आमटी महाप्रसादाचे ग्रामस्थांच्या वतीने आयोजन केले होते.
शिरूर तालुक्यात पूर्व भागात गेल्या महिनाभरापासून आदमापूर (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) येथील बाळूमामांची पालखी नंबर 9 चे आगमन झाले आहे.

या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे. तांदळी, चव्हाणवाडी, निर्वी, गुनाट, न्हावरे, आंधळगाव, वडगाव रासाई आदी भागांत पालखी गेल्यानंतर त्या त्या भागात नागरिकांनी भंडारा उधळून उत्स्फूर्त स्वागत केले होते. पालखी ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी बाळूमामांची बकरी पाहण्यासाठी व दर्शन घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते.

वडगाव रासाई येथे वास्तव्य झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने पालखी रथाला ट्रॅक्टर भेट देण्यात आला. मांडवगण फराटा येथे पालखी आल्यानंतर अखेरच्या दिवशी पुरणपोळी 2 ट्रॉली, आमटी 2 हजार लिटर, गुळवणी 2 हजार लिटर, भात 5 क्विंटल असा महाप्रसाद केला होता.

यामध्ये पुरणपोळी ही भाविकांनी घरोघरी बनवून आणली होती. तसेच मांडवगण फराटा येथील वसंतराव फराटे पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवायोजनेच्या 250 पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी व स्थानिक ग्रामस्थांनी या पालखी सोहळ्याला पाच दिवस अहोरात्र सहकार्य केले आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT