Latest

डॉ. सुनीलकुमार लवटे : एक संस्था

Arun Patil

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा आज (दि. 9) कोल्हापुरात नागरी सत्कार व गौरवग्रंथाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने…

सन 1980 च्या दशकातील गोष्ट असेल. मी तेव्हा अहमदनगर येथील महाविद्यालयात तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून नोकरी करीत होतो. अरुण शेवते आमच्या कॉलेजमधील तेव्हाचा विद्यार्थी. त्या वयात अरुण उत्तम कवी म्हणून नावारूपाला येत होता. पत्रकारितेत करिअर करावे, अशी त्याची व त्याच्या कुटुंबीयांची इच्छा होती. शिवाजी विद्यापीठात पत्रकारितेचा पदविकेचा अभ्यासक्रम आहे, असे समजल्यावर अरुण कोल्हापूरला रवाना झाला. तेथे त्याचा व लवटे सरांचा जवळून परिचय झाला. प्रा. सुनीलकुमार लवटे हे नाव तेव्हा माझ्या ऐकण्यात होते. तथापि, त्यांच्याविषयीची अधिक माहिती मला अरुणकडून समजली. विशेषतः, लवटे सर कसे विद्यार्थीप्रिय आहेत आणि ते विद्यार्थ्यांना सर्वप्रकारची मदत कशी करतात, हे मला अरुण सांगायचा. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा पैलू मला पहिल्यांदा समजला.

दुसरे असे की, स्वतः अरुण भाऊसाहेब खांडेकरांच्या लेखनाचा चाहता. लवटे सर आणि त्याच्यामधील हाही एक दुवा. पुढे लवटे सरांनी प्रयत्नपूर्वक खांडेकरांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला; पण त्याची पायाभरणी त्याआधीच झाली होती. एखाद्याला एखाद्या लेखकाचे लिखाण आवडते, याचा अर्थ बर्‍याच वेळेला असाही होतो की, तो लेखक व्यक्ती म्हणूनही त्याच्या मनाला स्पर्श करून गेलेला असतो. त्याच्याशी त्यांचे आंतरिक नाते जुळलेले असते. असाच काहीसा प्रकार मला खांडेकर आणि लवटे सर यांच्याबाबतीतही जाणवतो.

लवटे सरांना खांडेकर आवडतात आणि त्यांनी त्यांचे लेखन प्रसिद्ध करण्यात, त्यांचे संग्रहालय उभारण्यात पुढाकार घेणे, हा काही अपघात नव्हता. खांडेकरांचे एकूण साहित्य मानवी जीवनातील आदर्शांचा पुरस्कार करणारे आहे. ना. सी. फडके आणि वि. स. खांडेकर हे समकालीन लोकप्रिय साहित्यकार. कलेसाठी कला की जीवनासाठी कला, असा कलावादविरुद्ध जीवनवाद या दोन परस्परविरोधी वाङ्मयीन भूमिकांचे ते पुरस्कर्ते मानले जात. लवटे यांना खांडेकर जवळचे वाटले.

याचे कारणच ते मुळी स्वतः समाजाविषयी आपुलकी आणि आस्था असलेले व्यक्तित्व आहेत. स्वतः होऊन सामाजिक बांधिलकी एखाद्या व्रताप्रमाणे पत्करलेले आहेत. किंबहुना, ती त्यांच्या व्यक्तित्वाचा स्वाभाविक भाग बनलेली आहे. मी तर असे म्हणेन की, भाऊसाहेबांच्या एखाद्या कादंबरीतील नायक वाटावेत, असे त्यांचे जगणे आहे. खांडेकरांच्या कथा-कादंबर्‍यांचे नायक आदर्शवादी आहेत. स्वप्नाळू आहेत, अशी शेरेबाजी खरी मानली; तरी त्याचा अर्थ वास्तवात अशी माणसे नसतातच, असा घ्यायचे कारण नाही. कोणी असा घेऊ लागला, तर त्याला खुशाल लवटे सरांच्या सहवासात दोन-चार तास घालवायला सांगावेत. तो प्रामाणिक असेल, तर आपला आक्षेप नक्कीच मागे घेईल.

आपल्या भवतालच्या लोकांना मदत आणि मार्गदर्शन करणारे बरेच लोक समाजात सापडतील, नाही असे नाही. तथापि, लवटे सरांच्या बाबतीत हा प्रकार येथेच थांबत नाही. वैयक्तिकस्तरावर मित्रांना, परिचितांना, गरजूंना मदत करणे हा एक महत्त्वाचा पैलू आहेच; मात्र त्यापलीकडे जाऊन लवटे सरांनी या प्रकाराला संस्थात्मक सार्वजनिक रूप दिले. त्यातही एक व्यवस्था आणली. करवीरनगरीत क्वचितच अशी एखादी संस्था सापडेल की, जिच्याशी लवटे सरांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही. करवीरकरांनी त्यांना आपल्या नगरीचे भूषण मानले ते काही उगाच नाही. ही त्यांच्या कामाला दिलेली पोचपावती आहे.

सार्वजनिक कार्याचा एवढा व्याप असताना लवटे सरांनी आपल्या अध्ययन, अध्यापन, संशोधन या अंगीकृत कार्याशी कधीही तडजोड केली नाही. शिक्षक, प्रशासक, मार्गदर्शक, संशोधक, संपादक, प्रकल्प प्रमुख अशा विविध जबाबदार्‍या त्यांनी कार्यक्षमतेने व लिलया पेलून दाखविल्या. व्यवसायाने ते हिंदीचे अध्यापक; पण मराठीपासून ते कधीच तुटले नाहीत. उलट या दोन भाषांमधील सेतूचे काम त्यांनी केले. त्यांनी अनंत गोपाळ शेवडे यांच्याविषयी संशोधन करावे, हाही योगायोग नाही. मराठी माणसाने हिंदी जगतात किती परिचित व प्रतिष्ठित असावे, याची शेवडेजी ही जणू फूटपट्टीच आहे. त्या मापाने मोजले, तर आज लवटे सर हिंदी जगतात मराठीचे प्रतिनिधित्व करतात, असे निःशंकपणे म्हणता येते.

लवटे सरांनी जी मोठमोठी कामे आपल्या शिरावर घेतली व यशस्वीरीत्या पार पाडून दाखवली ती पाहता ते राजवाडे-केजवर अशा गेल्या पिढ्यांमधील वाटतात. आणखीन घटना सांगतो, महाष्ट्रातील प्रसिद्ध विद्वान व विचारवंत तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी विविध विषयांवर लेखन केले. ते साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांचे समग्र साहित्य मंडळाने प्रकाशित करणे उचितच होते; पण त्या पसार्‍याचे संकलन, संपादन करणे येरागबाळ्याचे काम नव्हते. लवटे सरांनी हे शिवधनुष्य उचलले, पेलले व लक्ष्यवेधही केला. शास्त्री बुवांच्या समग्र साहित्याचे खंड थोड्याच दिवसांत वाचकांच्या हाती पडतील.

या कामासाठी मराठी विद्वक्षेत्राने लवटे यांचे सदैव ऋणी राहायला हवे. या काळात सरांनी किती दक्षता दाखवावी याचे मीच अनुभवलेले उदाहरण सांगतो, 90 च्या दशकात प्रा. राजेंद्र होरा, प्रा. सुहास पळशीकर आणि मी एका दिवाळी अंकासाठी वाईला जाऊन शास्त्रीजींची दीर्घ मुलाखत घेतली होती. मात्र, तो अंक माझ्याकडे नव्हता. इतकेच काय; पण त्याचे नाव आणि वर्षही आठवत नव्हते. हे मी लवटे सरांना सांगितले. सरांनी एक-दोन महिन्यांतच तपास करून तो अंक मिळविला. समारोप करताना मला असे म्हणावेसे वाटते की, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संस्थात्मक कार्य करता करता लवटे सर स्वतःच एक संस्था झाले आहेत. या संस्थेने शतायुषी व्हावे व अनेकांना घडवावे, अशी ईश्वरचरणी प्रार्थना!

डॉ. सदानंद मोरे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT