Latest

डासच संपुष्टात आणतील डेंग्यू अन् चिकुनगुनिया

Arun Patil

नवी दिल्ली : डासांमुळे पसरणारा डेंग्यू आणि चिकुनगुनिया यांसारखे गंभीर आजार संपुष्टात आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवा उपाय शोधून काढला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) व वेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटरच्या पुद्दुचेरी येथील शास्त्रज्ञांनी असा एक डास विकसित केला आहे की, तो डेंग्यू आणि चिकुनगुनियाला रोखण्याचे काम करू शकतो.

भारतीय शास्त्रज्ञ या प्रयोगावर गेली चार वर्षे काम करत होते. यादरम्यान त्यांनी मादी एजिप्टी डासांच्या दोन कॉलनी विकसित केल्या. त्यातील डासांना 'वुल्बाचिया' बॅक्टेरियांनी संक्रमित केले. या डासांना 'वुल्बाचिया' डास असे नाव दिले. ज्यावेळी या डासांनी अंडी घातली व त्यामधून बॅक्टेरिया संक्रमित डासांचा जन्म झाला.

आयसीएमआर-व्हीसीआरसीचे डायरेक्टर डॉ. आश्विनी कुमार यांच्या मते, वुल्बाचिया बॅक्टेरिया हा डासांच्या प्रत्येक कोशिकेपर्यंत पोहोचतो. हा बॅक्टेरिया व्हायरसला नियंत्रित करण्यास सक्षम आहे. या संशोधनादरम्यान असे आढळून आले की, वुल्बाचिया बॅक्टेरियाने संक्रमित असलेले डास हे डेंग्यू व चिकुनगुनियाचे विषाणू पसरविण्यास सक्षम असत नाहीत. याचे कारण म्हणजे वुल्बाचिया बॅक्टेरियाने संक्रमित असलेले डास जेव्हा मादीशी मेटिंग करतात आणि जेव्हा नव्या डासांचा जन्म होतो, त्यावेळी नव्या डासांमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा व्हायरस पोहोचू शकत नाही. अशा रितीने डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा पसरणारा संसर्ग रोखला जाऊ शकतो. शास्त्रज्ञांच्या मते, नव्या डासांच्या मदतीने डेंग्यू व चिकुनगुनियाला रोखले जाऊ शकते. मात्र, या प्रयोगास केंद्र सरकारकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

SCROLL FOR NEXT