Latest

‘डार्कनेट’च्या माध्यमातून ड्रग्ज तस्करी

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : 'डार्कनेट' या विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने देशभर चालवल्या जाणार्‍या एका मोठ्या 'ड्रग्ज रॅकेट'चा 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'ने (अमली पदार्थ विरोधी विभाग – एनसीबी) पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 22 जणांना अटक केली आहे. संशयित आरोपींमध्ये 4 महिलांचाही समावेश आहे. विद्यार्थी, संगीतकार, व्यावसायिक अशा विविध समाजघटकांचा या रॅकेटमध्ये समावेश असल्याचेही उघड झाले आहे.

ड्रग्जची विक्री करणार्‍या 'डीएनएम इंडिया', 'डीआरईडी' आणि 'द ओरियंट एक्स्प्रेस' या डार्कनेटवरील तीन नेटवर्कचा भांडाफोड 'एनसीबी'ने केला आहे. डार्कनेटसह क्रिप्टो करन्सीचाही या रॅकेटची भरभराट होण्यात मोठा वाटा असल्याचे समोर आले आहे. डार्कनेट व क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून मागणीबरहुकूम ड्रग्जचा घरपोच पुरवठा केला जात होता. पेडलर वगैरेची यात गरजच लागत नाही.

दिल्ली-नोएडा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, आसाम, पंजाब, झारखंड, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये सातत्याने चार महिने एनसीबीचे तपासकार्य चालले. स्टेशनरी आणि बेकरी पदार्थांसह ग्राहकांना घरपोच ड्रग्ज उपलब्ध करून देण्यात येत होते, असे एनसीबीकडून सांगण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी तरुण आणि उच्चशिक्षित आहेत. एनसीबीने मोठा ड्रग्ज साठाही जप्त केला आहे.

ड्रग्ज सिंडिकेटचे दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात सक्रिय जाळे आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि फिलिपाईन्समध्येही या सिंडिकेटचे संबंध आहेत. हे रॅकेट डार्कनेटसह इंटरनेट फार्मसी या संकेतस्थळाचाही ड्रग्ज तस्करीसाठी वापर करीत होते. हे रॅकेट वापरत असलेल्या संकेत स्थळांपैकी नऊ संकेतस्थळे परदेशांत नोंदणी झालेली आहेत.

एनसीबीने दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेशातील विविध भागात छापेमारी केली. डार्कनेट, क्रिप्टो करन्सीत सौदा पार पडला, की कुरिअर पार्सलने ड्रग्ज पोहोचविले जात असे. ही तर्‍हा दस्तुरखुद्द एनसीबीलाही थक्क करणारी ठरली आहे. अटकेतील आरोपींपैकी एक वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी आहे, एक अभियंता आहे, एक संगीतकार आहे, तर एक मोठा व्यावसायिक आहे.

डार्कनेट म्हणजे काय?

डार्कनेट, ओव्हरले नेटवर्कवर अस्तित्वात असलेली डार्क वेब ही एक जागतिक स्तरावरील वेबसामग्री आहे. इंटरनेटचा वापर तर यात होतो. पण, अ‍ॅक्सेस करण्यासाठी विशिष्ट सॉफ्टवेअर, कॉन्फिगरेशनची गरज असते. यामुळे डार्क वेब हा एकूण वेबमधील एक अत्यंत लहान घटक म्हणून समोर येतो… आणि हा घटक 'सर्च इंजिन'कडून नोंदविला जात नाही. यातूनच डार्कनेटचा वापर बेकायदा कृत्यांसाठी केला जातो.

मित्र ते मित्र, सहकारी ते सहकारी, संघटनांकडून सदस्यांसाठी संचलित 'टोर', 'फ्रीनट', 'आय 2 पी' आणि 'रायफल'सारखे नेटवर्क समाविष्ट आहेत. 'एनसीबी'ने उघड केलेले सिंडिकेटही ड्रग्ज खरेदी-विक्रीसाठी डार्कनेटचा वापर करत असत. व्यवहारही क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून होई. क्रिप्टो हे एक डिजिटल चलन आहे. संगणकीय नेटवर्कद्वारे व्यवहाराचे माध्यम म्हणून काम करण्यासाठी तयार केलेले आहे. ते सरकार किंवा बँकेसारख्या कोणत्याही केंद्रीय प्राधिकरणावर अवलंबून असलेले नाही.

* 'डार्कनेट'वर 'क्रिप्टो करन्सी'त बुकिंग; ड्रग्ज कुरिअरने घरपोच
* सिंडिकेटची 'मोड्स ऑपरेंडी' पाहून अधिकारीही थक्क
* महाराष्ट्र, यूपीसह 9 राज्यांत सतत 4 महिने एनसीबीचे तपासकार्य
* संशयित आरोपींमध्ये मेडिकलचा विद्यार्थी आणि अभियंता

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT