Latest

डाऊनलोड होणार मन?

Arun Patil

'डाऊनलोड करण्याजोगे मन' तयार करणे ही केवढी विलक्षण क्रांती आहे, हे वेगळे सांगायला नको. यामुळे सर्वसामान्य व्यक्तींनाही स्वतःच्या मेंदूत डोकावता येईल आणि आपल्या स्मृतींची हवी तशी पुनर्रचना करता येईल.

जन्माला येऊन अखेरीस मरणार्‍या प्रत्येकच मानवाला अमरत्वाचे एक गूढ आकर्षण अगदी सुरुवातीपासून आहे. जगातील सर्वच जातिधर्मांतील तत्त्वज्ञ आणि विचारवंतांनी या विषयावर विविध विचार मांडले आहेत. शरीर नष्ट होते; परंतु आत्मा अमर राहतो, 'मरावे परि कीर्तिरूपे उरावे' ही आणि अशी वचने तर गेली हजारो वर्षे सर्वांना माहीत आहेत. मात्र, त्यामागील मूलतत्त्व व्यावहारिक पातळीवर प्रत्यक्षात आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. कारण, शरीराबरोबरच 'मन' नावाची एक गोष्ट मानवाकडे आहे, जिचा खरा अर्थ अद्याप मानवालाच उलगडलेला नाही! परंतु आता मानवी मेंदूवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि सूक्ष्म तंत्रज्ञान ऊर्फ नॅनोटेक्नॉलॉजीशी संबंधित तंत्रज्ञ यांनी एकत्र येऊन एक वेगळाच प्रकल्प सुरू केला आहे.

रशियातील संवाद माध्यमांच्या क्षेत्रातले एक मोठे नाव म्हणजे दिमित्री इटस्कोव्ह. 'अवतार' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे (जेम्स कॅमेरूनचा चित्रपट नव्हे) प्रमुख असलेल्या इटस्कोव्ह आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सन 2045 पर्यंत, अमरत्व साध्य करण्याचा चंग बांधला आहे! मनुष्याप्रमाणेच दिसणारे यंत्रमानव आपण हॉलीवूडच्या चित्रपटांमधून पाहतो (त्यांना 'अँड्रॉईड' किंवा 'सायबोर्ग' असे नाव आहे). अशांच्या शरीरात खराखुरा मानवी मेंदू बसवून त्यामार्फत त्यांच्या हालचाली घडवण्याची आणि कालांतराने मेंदूचे सर्व व्यवहार संगणकीय मायक्रोचिपवर उतरवण्याची ही योजना आहे, असे थोडक्यात सांगता येईल.

अर्थात, हे दिसते तेवढे सहजसाध्य नाही, याची जाणीव इटस्कोव्ह यांनाही असणार, हे उघड आहे! खरे तर मानवी मेंदू आणि मानसिक पातळीवरील मानवी व्यवहारांसंबंधी शास्त्रज्ञांनी गेल्या पन्नास वर्षांत वर्तवलेले एकही भाकीत प्रत्यक्षात आलेले नाही, असे ढोबळमानाने म्हणता येईल. उदा., येत्या वीस वर्षांत माणसासारखेच काम आणि विचार करणारा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बनवण्याचा निश्चय आपण गेली पन्नास-साठ वर्षे ऐकतो आहोत! नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये कोणता 'ब्रेकथ्रू' केव्हा मिळेल याचा अंदाज वर्तवता येत नसल्याने असे होते, असे म्हणता येईल. 'प्रोजेक्ट अवतार'देखील याला अपवाद नाही; परंतु हा प्रकल्प सध्या हाती असणार्‍या तंत्रज्ञानाचा पाया वापरून पुढील उडी मारणार असल्यामुळे तो प्रत्यक्षात येण्याचा बराच संभव आहे. शिवाय, तंत्रज्ञानातील बदलाचा चक्रावणारा वेग पाहता हे शक्य वाटते; परंतु जाहीर केलेल्या मुदतीत नव्हे.

अर्धमानव तयार करून त्याच्याकडून विविध कामे करवून घेण्याचा इटस्कोव्ह यांचा हा पहिलाच आधुनिक प्रयोग किंवा प्रयत्न नाही. अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या ऊअठझअ या विभागामार्फत या दिशेने संशोधन करण्यासाठी फक्त एका वर्षात 7 दशलक्ष डॉलर्सची तरतूद केली गेली आहे, म्हणजे पाहा! (जाताजाता अठझअ हे मूळ नाव आहे, 'अ‍ॅडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी'. ऊ म्हणजे डिफेन्स.) युद्धासंबंधीचे तंत्रज्ञान कितीही पुढे गेले असले, तरी अद्यापही प्रत्यक्ष आघाडीवर जाऊन लढणार्‍या शिपायाला म्हणजेच 'फूट सोल्जर'ला पर्याय नाही, हे आपण पाहतोच. त्यामुळे सैनिकाला जास्तीत जास्त काळापर्यंत सुरक्षित ठेवण्याला प्रत्येकच देशाच्या लष्कराचे प्राधान्य असते. अँड्रॉईडशी होऊ शकणार्‍या संवादाची व्याप्ती वाढवून त्याला सैनिकाचा पर्याय ऊर्फ 'सरोगेट'च्या रूपाने कामाला लावण्याचा ऊअठझअ चा प्रयत्न आहे.

असे संवाद माध्यम (इंटरफेस) बसवलेले अर्धमानव विकलांग व्यक्तींना तर उपयोगी पडतीलच; शिवाय मानवाला धोकादायक असलेल्या परिस्थितीत कामे करण्यासाठी तसेच मदत आणि बचाव कार्य करण्यासाठीदेखील त्यांचा वापर प्रभावीपणे करून घेता येईल. हा संवाद निव्वळ मेंदूतील विचार तरंगांद्वारे होणार असल्यामुळे तो जास्तीत जास्त अंतरावरून साधता यावा, या द़ृष्टीने प्रयत्न चालू आहेत (हॉलीवूड 'अवतार' हा चित्रपट पाहिलेल्यांना या तंत्राची चटकन कल्पना येईल). अशा अर्धमानवामध्ये प्रत्यक्ष मानवी मेंदूच बसवला जाणार असेल, तर त्याला प्राणवायू इत्यादी मूलभूत बाबींचा पुरवठा करून जिवंत आणि (मुख्य म्हणजे) कार्यक्षम स्थितीत ठेवावे लागेल. यासाठी लागणारी 'लाईफ सपोर्ट सिस्टीम' 2025 पर्यंत तयार होईल, असा अंदाज आहे.

आज जगभरात लाखो व्यक्ती हॉस्पिटल्समधील पलंगांवर असहाय्यपणे पडून आहेत; कारण त्यांच्या मेंदूने उर्वरित शरीराशी असहकार पुकारला आहे किंवा मेंदू तल्लख असला, तरी शरीर धडधाकट नाही! अशा विकलांग व्यक्तींवर जैविक आणि इलेक्ट्रॉनिक अवयवांच्या अद्वैताचा हा प्रयोग करून त्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जाईल. मेंदूला बाहेरून जीवनावश्यक सामग्री सातत्याने पुरवण्याचे हे काम अर्थातच विलक्षण अवघड आहे. माकडाचा मेंदू बदलण्याचा यशस्वी प्रयोग डॉ. रॉबर्ट व्हाईट यांनी 1970 च्या दशकातच केला होता; परंतु त्या दिशेने खूपच संशोधन होणे अद्याप बाकी आहे.

2035 पर्यंत मेंदूची अंतर्रचना आणि कार्यपद्धती 'रिव्हर्स इंजिनिअरिंग' तंत्राने समजून घेऊन मानवी विचार प्रणालीची म्हणजेच मनाची अर्ध कृत्रिम आवृत्ती तयार करता येईल, अशी आशा आहे. 'डाऊनलोड करण्याजोगे मन' तयार करणे ही केवढी विलक्षण क्रांती आहे, हे वेगळे सांगायला नकोच! यामुळे सर्वसामान्य व्यक्तींनाही स्वतःच्या मेंदूत डोकावता येईल आणि आपल्या स्मृतींची हवी तशी पुनर्रचना करता येईल! मानवी अवयवांना इलेक्ट्रॉनिक सहाय्य पुरवल्याने किंवा विकलांगांना असे अवयव बसवल्याने काय साधता येते, हे आपण लंडन पॅरालिम्पिकमधील अपंग खेळाडूंच्या कामगिरीकडे नजर टाकल्यास लगेचच समजते. कृत्रिम पाय बसवलेले खेळाडू तगड्या अ‍ॅथलेटस्पेक्षा वेगाने पळू शकतात.

या प्रक्रियेतील पुढची पायरी अगदी विज्ञानकथेमध्ये शोभणारी आहे. सन 2045 मध्ये मानवी मन, कोणत्याही शारीरिक आधाराशिवाय, कॉम्प्युटरमधील मायक्रोचिपवर डाऊनलोड करता येईल, असे इटस्कोव्ह यांना वाटते. एवढेच नव्हे, तर आभासी शरीरामध्ये म्हणजे मानवाच्या 'होलोग्राफीक थ्री-डी' प्रतिमेतदेखील ही विचार प्रणाली बसवता येईल! हा होलोग्राफीक मानव भिंतींमधूनही आरपार जाऊ शकेल, तेही जवळजवळ प्रकाशकिरणांच्या वेगाने. माणसाच्या शरीरात बसवता येणार्‍या अतिसूक्ष्म नॅनोबोट्स (नॅनो रोबोट्स) बाबत आपणास माहीत असेल. अशा नॅनोबोट्सनीच बनवलेले शरीर, गरजेनुसार, कोणताही आकार धारण करू शकेल! अशा रीतीने हॉलिवूडच्या विज्ञानपटांत दिसणारे 'स्पेशल इफेक्टस' प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता लवकरच निर्माण होणार आहे. मानवी उत्क्रांतीचीच ही एक पुढची पायरी म्हणता येईल!!

ह्या सर्व प्रकल्पाची व्यावहारिक बाजूदेखील जरा समजून घेऊ – अशा तर्‍हेच्या संशोधनासाठी अफाट पैसा लागतो आणि तो व्हर्युअल असत नाही तर धडपड करून प्रत्यक्षरूपात उभारावा लागतो! खुद्द इट्सकोव्ह यांनी स्वतःचे भरपूर भांडवल ह्यामध्ये गुंतवले आहे. शिवाय नवकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे 'व्हेंचर कॅपिटल' म्हणजे साहसवित्त पुरवणार्‍या धनाढ्य व्यक्ती, संस्था, सरकारी यंत्रणा आणि उद्योगांनाही त्याने आवाहन केले आहे. ह्या प्रकारच्या संशोधनाचा – संभाव्य अमरत्वापेक्षाही – वैद्यकीय आणि लष्करी क्षेत्रामध्ये फार मोठा उपयोग होऊ शकतो हे उघड आहे. त्यामुळे त्यादृष्टीने काही घटकांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन आणि वितरण करण्यासाठी सहकार्य मिळवण्याबाबत इट्सकोव्ह यांचे प्रयत्न सुरू आहेत. रशियाच्या शास्त्र-शिक्षण मंत्रालयाने नुकताच ह्या उपक्रमाला पाठिंबा जाहीर केला आहे. अशा तर्‍हेच्या कामाला समाजातील मान्यवरांनी प्रोत्साहन दिले तर त्याचेही दूरगामी सकारात्मक परिणाम होतात. इट्सकोव्हने चक्क दलाई लामांचाच वरदहस्त मिळवला आहे! आणि हे सयुक्तिकही वाटते – अमरत्व, पुनर्जन्म, अविनाशी आत्मा ह्याबाबतच्या आशियाई धर्मांच्या संकल्पना अधिक मुरलेल्या, परिपक्व आणि स्पष्ट आहेत, नाही का?!

अर्थात हा सगळा उद्योग म्हणजे पारंपारिक संकल्पनेतले 'अमरत्व' नाही असा काहींचा सूर आहे. मेंदू एकाचा, शरीर दुसर्‍याचे तर मग अमर झालेला 'मी' नक्की कोणता? अशी त्यांची पहिली शंका आहे. शिवाय मन आणि आत्मा ह्यांसारख्या व्हर्चुअल गोष्टींबाबत मनुष्याला आज एक टक्काही ज्ञान नसताना अमरत्व ही वल्गना ठरू शकते असेही काहींना वाटते. कोठल्यातरी त्रयस्थाच्या शरीरात किंवा मायक्रोचिपवर राहण्यापेक्षा पुढील हजारो वर्षे लोकांच्या आठवणीत राहील असे लोकोत्तर कार्य करणार्‍यालाच खरे अमरत्व मिळते असेही मत आग्रहाने मांडले जात आहे. शिवाय ह्या अमरपट्ट्याचा दुरूपयोग केला जाणार नाही हे कशावरून? इंग्रजी चित्रपट पाहणार्‍यांना हॅरिसन फोर्डने साकारलेल्या 'इंडियाना जोन्स'चे चित्रपट चांगलेच माहीत आहेत. विकृत मनोवृत्तीच्या हुकुमशहांनी अमरत्व हस्तगत करण्यासाठी केलेली धडपड ह्या चित्रपटमालिकेच्या चारही भागांत दाखवली आहे. त्यामधून योग्य बोध घेतल्यास अमरत्व वरदान ठरू शकते नाहीतर…!

डॉ. दीपक शिकारपूर

SCROLL FOR NEXT