Latest

ठाण्यात नायजेरियन सह महिला ड्रग्ज पेडलर्स अटकेत

Arun Patil

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : अमली पदार्थाच्या तस्करीत नायजेेरियन नागरिकांचा सहभाग वाढत आहे. मुंब्रा पोलिसांनी नुकत्याच पुन्हा एका नायजेरियन नागरिकास त्याच्या महिला साथीदारासह मुंब्रातून एमडी ड्रग्ज विक्री करताना अटक केली. दोघांकडून 16 लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.

इझोबियालो उगोचिकू सुंडे (33, खारघर, नवी मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव असून त्याची साथीदार महिला शमा हसन सय्यद (37, मुंब्रा) हिलादेखील पोलिसांनी गजाआड केले आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्यातून तीन महिन्यांत चार कोटींपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिवा परिसरातून एका नायजेेरियन नागरिकास एमडी पावडर विक्री करताना अटक केली होती.त्याच्याकडून 25 लाख 14 हजाराचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

मुंब्रा पोलिसांना एक महिला व तीन पुरुष संशयास्पद स्थितीत दिसून आले. दोन पुरुष पळून गेले. अटक केलेला अट्टल ड्रग्ज तस्कर असल्याचे समोर आले. तर त्याची साथीदार महिला मुंब्रा येथे ड्रग्ज विक्री करीत असल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले. हे ड्रग्ज कोणास विक्री करण्यात येणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत

ड्रग्ज तस्करीत नायजेेरियन नागरिकांचा वाढता सहभाग

गेल्या काही वर्षापासून ठाण्यासह आसपासच्या परिसरात नायजेरियन नागरिकांद्वारे होणार्‍या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. अंमली पदार्थांची तस्करी, विवाहविषयक साईट्स वरून भारतीय तरुणींची फसवणूक, ऑनलाईन फसवणुकी, इमेल हॅकिंग, आणि ऑनलाईन बँकिंगच्या आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.

ठाणे आयुक्तालयात गेल्या वर्षभरात सुमारे 78 नायजेेरियन नागरिकांना अमली पदार्थ विक्रीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबई, वसई, विरार, नालासोपारा आदी भागात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या नायजेरीयन नागरिकांच्या गुन्हेगारी हालचाली रोखण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

मुंब्रात सर्वाधिक ड्रग्ज डिलिंग

मुंब्रात गांजा, अफिंम व एमडी पावडर विक्रीचे जिल्ह्यातील सर्वांत मोठे नेटवर्क आहे. बाहेर राज्यातून ठाण्या-मुंबईत येणार्‍या एकूण ड्रग्ज साठयापैकी तब्बल 35 टक्के ड्रग्ज साठ्याची विक्री एकट्या मुंब्रातून केली जाते असा अंदाज सामाजिक संस्थांनी वर्तवला आहे. तीन महिन्यात एकूण कारवाई पैकी सर्वाधिक कारवाई मुंब्रात करण्यात आल्या आहेत.

SCROLL FOR NEXT