Latest

ठाणे : वासिंद ते आसनगाव दरम्यान मालगाडीमध्ये बिघाड, कसाराकडे जाणारी वाहतूक ठप्प

Shambhuraj Pachindre

कसारा : शाम धुमाळ: कल्याण कसारा रेल्वे मार्गांवरील वासिंद ते आसनगाव दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने आज सकाळी सहा वाजल्यापासून मध्य रेल्वेची कसाराकडे जाणारी रेल्वे वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली होती. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मालगाडी वासिंद ते आसनगाव दरम्यान डाऊन मार्गावर थांबली होती. मालगाडी सकाळी पावणे सहा वाजल्यापासून थांबली असल्याने कसाराकडे जाणाऱ्या लोकलसह लांब पल्याच्या अनेक गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. तिथे रेल्वेचे काही कर्मचारी गेले व त्यांनी दुरूस्तीचे काम सुरु केले. तब्बल दीड तासांने कसाऱ्याहून दुसरे इंजिन मागवण्यात आले व नंतर मालगाडी आसनगावच्या दिशेने पुढे घेण्यात आली. परिणामी मालगाडीमुळे आज सकाळी दीड तास कल्याण ते कसारा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

परिणामी सकाळी कामावरती निघालेल्या चाकरमानी प्रवाशांना कामावर जायला विलंब झाला. तसेच लोकल वेळेवर येत नसल्याने आसनगाव, आटगाव, खर्डी, कसारा रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली होती.

सात वाजता मालगाडी सुरू झाली

वाशिंद आसनगाव दरम्यान बंद झालेली मालगाडी सात वाजता सुरू झाली . त्यामुळे झालेली रेल्वे वाहतूक कोंडी एक तासाने सुरळीत झाली.

शाळेतील मुलांसह कामगारांचा रेल्वेट्रॅकमधून पायी प्रवास

दरम्यान तासंनतास ताटकळत बसलेल्या प्रवाशांनी खडवली व वासिंद रेल्वे स्थानकाच्या मध्ये जंगलात उभ्या असलेल्या कसारा लोकलमधून उतरून वाशिंदच्या दिशेने पायी प्रवास सुरु केला. वेळेत शाळेत पोहचण्यासाठी शाळकरी मुले, व कंपनीमध्ये जाणाऱ्या कामगारांनी जीव धोक्यात घालून अप दिशेच्या रेल्वे ट्रकवरून पायी जात आपले नियोजित ठिकाण गाठले.

कल्याण ते कसारा रेल्वे प्रवाशांना वाली कोण?

मेल एक्सप्रेस आणि मालगाड्या यांच्या सेवेला प्राधान्य देणाऱ्या मध्य रेल्वेच्या प्रशासनाच्या लोकल सेवेला दुय्यम नव्हे थर्ड दर्जा दिला जात असल्याने याठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गाला दररोज उशिरा लोकलच्या प्रवासाने बेजार करून सोडले आहे. या आदिवासी दुर्गम भागातील प्रवाशांना ना आमदार ना खासदार कोणीच वाली उरला नसल्याच्या संतप्त भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या आहेत. रेल्वे प्रवाशी संघटना या नावाला असून त्यांच्यामुळे कोणताही फायदा होत नाही आणि यापुढे होणार नाही अशी तिखट प्रतिक्रिया प्रवासी व्यक्त करीत आहेत.

शहाड ते आसनगावपर्यंत कोणत्याही स्थानकात साधी सूचना सुद्धा रेल्वे प्रशासन देत नाही. सकाळी सकाळी मालगाड्या आणि संध्याकाळी मेल एक्सप्रेस यांच्या वाढत्या संख्येमुळे लोकल सेवेचा बोजवारा उडालेला असतो.  प्रत्येक कसारा लोकलच्या अगोदर सकाळी मालगाडी पुढे काढण्यात येते. परिणामी रेल्वे ट्रॅकला तडा जाणे, इंजिनमध्ये बिघाड होणे यासह अनेक कारणास्तव सकाळच्या लोकल सेवेचा बोजवारा उडत असतो.

दरम्यान आठवड्यातून किमान दोन दिवस तरी प्रवशांची लटकंती होत असते. कधी मालगाडी बंद तर कधी सिग्नल प्रॉब्लेम याबाबत प्रवाशांनी अनेक तक्रारी मीडिया व सोशल मीडियातून केल्या. भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार कपिल पाटील यांना या बाबत निवेदन दिली. परंतु खा.पाटील यांनी कल्याण कसारा मार्गांवरील प्रवाशांच्या तक्रारी ,समस्येकडे दुर्लक्ष केले. शिवाय कसारा कल्याण मार्गांवर तिसऱ्या मार्गिकेचे काम गेली 5 वर्षांपासून सुरु आहे. परंतु या मार्गिकेचे काम टक्केवारीत अडकल्याने संथ गतीने सुरु आहे.

प्रवासी संघटना कुचकामी असल्याने या कसारा कल्याण रेल्वे प्रवासादरम्यानच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असा गभीर आरोप नियमित दादर ते कसारा प्रवास करणाऱ्या जे. डी. येसरे या प्रवाशाने केला आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT