Latest

टोकियो ऑलिम्पिक : नव्या भारताची ओळख

अमृता चौगुले

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने चांगली कमाई केली. आजवरच्या इतिहासात इतक्या विविध क्रीडा प्रकारांत भारताला अधूनमधून पुरस्कार मिळाले; पण शासकीय पातळीवर पुढाकार घेऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा सुखद अनुभव प्रथमच येतो आहे. म्हणूनच क्रीडाप्रेमींपेक्षाही प्रत्यक्ष मैदानात उतरून खेळणार्‍यांचा आनंद अधिक द्विगुणीत करणारा आहे.

यात राजकारण असण्याचे वा आणण्याचे कारण नाही; पण या खंडप्राय देशाचे दुर्दैव असे, की कुठल्याही विषयात राजकारण ओढून आणले जाते. जसे याही वेळी विविध यशस्वी खेळाडूंची पाठ राजकीय नेत्यांनी थोपटली असताना अमूकतमुकाने कौतुक केले नाही, अशाही बातम्या झळकत राहिल्या. खरे तर ज्याला त्यात उत्सुकता वा स्वारस्य असेल, त्यानेच तसे कौतुक केले पाहिजे. तसे नसेल तर उगाच औपचारिकता म्हणून कौतुक करण्याने प्रसिद्धी मिळते, पण खेळाला वा खेळाडूंना त्याचा कसलाही फायदा होत नसतो. म्हणूनच कोणा एका मोठ्या राजकारण्याने पाठ थोपटली नाही तर रडण्याचे कारण नाही.

पंतप्रधान, राष्ट्रपती वा ठराविक राज्याचे मुख्यमंत्री कुणा खेळाडूच्या यशाचे खास कौतुक करीत असतील तर इतरांना दोष देण्यात अर्थ नाही. मात्र, काहीजण त्या औपचारिकतेच्या पलीकडे जाऊन पुढाकार घेतात, त्याचे कौतुक झाले पाहिजे. ज्याची साक्ष माजी खेळाडू अंजू बॉबी हिने मुलाखतीतून दिली. यापूर्वीही क्रीडामंत्री वा पंतप्रधानांनी असे कौतुक केले होते; पण यावेळी सामना वा स्पर्धेपूर्वी पंतप्रधान जातिनिशी फोन करतात, प्रोत्साहन देतात. किंबहुना, एखाद्या सामन्यात अपयश पदरी आल्यास पुढला सामना हिरिरीने खेळण्यास प्रवृत्त करायला संपर्क साधतात. असे पूर्वी कधी झाले नाही, ही अंजूची साक्ष त्याचाच पुरावा आहे.

दुसरीकडे एकामागून एक महत्त्वाची पदके हरियाणाच्या युवक-युवतींनी संपादन केल्यावर तिथले मुख्यमंत्री पाठ थोपटायला पुढे सरसावले तर नवल नव्हते. देशाला यंदाचे सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोपडा त्यांच्या राज्याचा नागरिक आहे; पण त्याचवेळी तो सुरक्षा दलाचा सैनिकही असावा हा योगायोग. त्याखेरीज पैलवान म्हणून इतर महत्त्वाची पदके देशाला मिळवून देणारे खेळाडूही त्याच हरियाणाचे असल्यावर त्यांची छाती फुगली असेल तर नवल नाही.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी तर एका कुस्तीगिराच्या पराक्रमाला दाद देताना राज्याच्या धोरणाचा उल्लेख अगत्याने केला. ऑलिम्पिक विजेत्या प्रत्येक खेळाडूला थेट कोट्यवधी रुपयांचा पुरस्कार व नोकरीसह राहत्या घराचीही भेट देण्याचे धोरण मागल्या कित्येक वर्षांपासून हरियाणा राबवतो आहे. म्हणून तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्या इवल्या राज्याचे एकामागून एक विक्रमवीर उदयास येत आहेत. आता तर खट्टर यांनी विजेत्या एका खेळाडूच्या गावातच स्टेडियम उभारून त्या परिसरातील गुणवान मुलांमधून जागतिक कीर्तीचे खेळाडू घडवण्यासाठी प्रकल्प जाहीर केला.

ईशान्येकडील मीराबाई चानू हिने आपल्या यशात बहुमोल वाटा असणार्‍या ट्रकड्रायव्हर मंडळींना बोलावून त्यांचा सत्कार केला. कारण, दुर्गम भागातल्या या मुलीला रोज सरावाच्या केंद्रात सोडण्याचे काम त्या सामान्य ड्रायव्हरनी अगत्याने पार पाडले होते. देशातली दुर्गम वा इवली राज्ये इतकी मोठी मजल मारत असताना देशातील सर्वात प्रगत व संपन्‍न मानल्या जाणार्‍या महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रातील स्थान नेमके कोणते; असाही प्रश्‍न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. खेळाडू कुठल्याही राज्यातला असो, देशाला त्याने पदक मिळवून दिल्याचा आनंद मराठी माणसालाही झाल्याशिवाय राहात नाही; पण त्या पदक विजेत्यांमध्ये मराठी मुले किती, हा प्रश्‍न मनात येतोच आणि कोणी नसल्याचे वैषम्य थोडे थोडके नसते.

पुढारलेल्या व पैशानेही गरीब नसलेल्या महाराष्ट्रात हा क्रीडाक्षेत्रातला दुष्काळ कधी संपायचा? विषय खेळातली क्षमता नसण्याचा नाही. तर, असलेल्या क्षमतेला खतपाणी घालून मशागत करण्याचा असतो. तिथे महाराष्ट्र कमी पडतो व कमी पडलाय, ही वस्तुस्थिती आहे; अन्यथा ऑलिम्पिक दर्जाच्या क्रीडा सुविधा पुण्यानजीक बालेवाडीमध्ये असताना हा दुष्काळ का भेडसावू शकतो? कुठे एखादी राही सरनोबत नावाची नेमबाज आपल्या परीने अतोनात राबून पात्रता संपादन करते, तिला कुठल्या सुविधा शासनाने पुरवलेल्या असतात? सातारा जिल्ह्यातल्या प्रवीण जाधवने गरीब कुटुंबात व झोपडीत जन्म घेऊन ऑलिम्पिक पदकाची महत्त्वाकांक्षा बाळगली. तिथंपर्यंत मजलसुद्धा मारली. तर, त्याला शासनाने भूखंड दिलेला असतानाही तिथे घर बांधण्याच्या विरोधात धमक्या दिल्या जातात, ही वस्तुस्थिती आहे. तिथेच विषय थांबत नाही.

बालेवाडीच्या क्रीडानगरीत जागतिक दर्जाच्या सुविधा आहेत, तिथे कोणाला चालत जायला परवानगी नाही; पण मंत्र्यांच्या गाड्या दौडू शकतात. यापेक्षा क्रीडा क्षेत्राची भयंकर आबाळ काय असू शकते? या पदक विजेत्यांच्या यादीत महाराष्ट्र दिसत नसेल तर त्यासाठी कुठला आयोग वा समिती नेमून कारणे शोधण्याची गरज नाही. राज्याच्या राजकीय नेत्यांनी आरशासमोर नुसते उभे राहून आपला चेहरा बघितला तरी खाशाबा जाधवांना आपण विसरून गेल्याचे सहज लक्षात येऊ शकेल. सत्तर वर्षांपूर्वी जगाला मराठी कुस्तीचा फड दाखवणार्‍या खाशाबांच्या महाराष्ट्राची शान हरियाणा कसा पळवून देऊ शकला; त्याचे उत्तर मिळू शकेल.

SCROLL FOR NEXT