Latest

टीप मिळाली अन् शेकडो सिलिंडर गायब

सोनाली जाधव

कोल्हापूर : प्रशांत साळुंखे

करवीर तालुक्यातील वसगडे हायस्कूलजवळ 6 मे रोजी दुपारी 12.14 वाजता बेकायदेशीररीत्या शेकडो सिलिंडरचा साठा कॅमेराबद्ध झाला. यावरून जिल्हाधिकार्‍यांनी 7 मे रोजी सकाळी तपासाचे आदेश दिले आणि मंडल अधिकार्‍यांनी दुपारी 12.32 वाजता भेट देऊन समोर दिसणारा साठा कॅमेराबद्ध केला. त्यांच्या कॅमेरात खुल्या जागेत लहान 42, मोठी 9 आणि वाहनात 9 कमर्शिअल सिलिंडर दिसतात. प्रत्यक्ष निरीक्षणात 72 सिलिंडरची नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. टीप मिळाल्यानंतर सकाळी 9 ते 12 च्या दरम्यान शेकडो सिलिंडरचा साठा गायब झाला कोठे? हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शंभर किलोच्या वर किंवा मोकळे गॅस सिलिंडर डिस्ट्रिब्युटर सोडून इतर कोणीही मोठ्या संख्येने साठा करणे हा गुन्हा आहे. सामान्य नागरिकांनी दोनपेक्षा जास्त सिलिंडर बाळगली, तर कारवाईचा बडगा उगारला जातो. वसगडे हायस्कूलजवळ तर एजंटने शेकडो धोकादायकरीत्या, बेकायदेशीररीत्या साठवलेल्या सिलिंडरवर काय कारवाई होते, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
गॅस एजन्सीमार्फत सबडिलर नेमणूक करता येते; मात्र त्यांना दहापेक्षा जास्त सिलिंडर ठेवता येत नसल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. मात्र, घराच्या शेजारी कोणत्याही प्रकारची सुरक्षा न बाळगता सरळसरळ शेकडो सिलिंडरची साठेबाजी करण्यात आली. गेल्या महिन्यात पुण्यात 13 सिलिंडरचा स्फोट झाला. अशा अनेक घटना घडत असताना एजंट ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर साठेबाजी करून काळाबाजार करताना दिसत आहेत. सर्व गॅस कंपन्यांच्या डिस्ट्रिब्युटरनी आपापले खासगी एजंट नेमले आहेत, ते कुठेही मोकळ्या जागेत अथवा खासगी जागेत बेकायदेशीररीत्या साठा करत आहेत, जिथे कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था नसते, असे साठे बर्‍याचदा रहिवासी एरियामध्ये ठेवले जातात, ज्यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ होत आहे. काही लोक याबाबतीत तक्रारदेखील करत आहेत; पण असे एजंट व डिस्ट्रिब्युटर संबंधित अधिकार्‍यांना हाताशी धरून राजरोसपणे लोकांच्या जीवाशी खेळत आहेत.

सिलिंडरची साठेबाजी; एजंटांचा सुळसुळाट

शहरी भाग सोडला तर बाकी ग्रामीण भाग, महामार्गावरील हॉटेल, धाबे आणि एमआयडीसीमधील काही कारखानेदेखील व्यावसायिकऐवजी घरगुती गॅस सिलिंडर काळ्या बाजारातून खरेदी करून वापरत आहेत. असे 14 किलोचे घरगुती गॅस सिलिंडर 50 ते 100 रुपये जास्त देऊन सर्रास हॉटेल आणि कारखान्यामध्ये वापर होत आहे, ज्याकडे प्रशासनाचा कानाडोळा होत आहे. गॅस सिलिंडरचा काळाबाजार, साठा व अनधिकृत एजंटवर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

SCROLL FOR NEXT