Latest

जोतिबा डोंगर : भाविकांच्या अमाप उत्साहात जोतिबाचा पहिला खेटा

Shambhuraj Pachindre

जोतिबा डोंगर : पुढारी वृत्तसेवा

'जोतिबाच्या नावानं चांगभलं'च्या अखंड गजरात दख्खनचा राजा श्री जोतिबाचा पहिला खेटा रविवारी भाविकांच्या अमाप उत्साहात पार पडला. दोन वर्षे कोरोना निर्बंधांमुळे खेट्याची परंपरा खंडित झाली होती. रविवारी भाविकांनी प्रचंड गर्दी करत आपल्या लाडक्या जोतिबाचे दर्शन घेतले.

रविवारी पहाटे चार वाजता मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. श्रींची पाद्यपूजा व काकड आरती झाल्यानंतर भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. सकाळी आठ वाजता श्रींना अभिषेक करून खडी अलंकारिक पूजा बांधण्यात आली. दुपारी धुपारती सोहळा झाला.
दिवसभरात पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी मंदिरातील व्यवस्थेची पाहणी केली. सायंकाळी श्रींचा पालखी सोहळा झाला.

यावेळी भाविकांसाठी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मंदिराच्या बाहेर दर्शन रांगेसाठी मंडप घालण्यात आला होता. भाविक-पोलिसांत वादावादी दिवसभर दर्शन गेटवर पोलिस आणि भाविक, ग्रामस्थ यांच्यात अनेकदा वादावादीचे प्रकार घडले. काही पोलिस कर्मचार्‍यांनी भाविकांशी उद्धट वर्तन केल्याच्याही तक्रारी करण्यात आल्या. त्यामुळे पोलिसांच्या वर्तणुकीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.

SCROLL FOR NEXT