Latest

जोतिबा चैत्र यात्रा : देवा जोतिबा चांगभलं…

Arun Patil

कोल्हापूर / जोतिबा डोंगर, पुढारी वृत्तसेवा : 'चांगभलं रं चांगभलं… देवा जोतिबा चांगभलं… माया-ममता गुलाल उधळू, भावभक्तीची फुलं रं… चांगभलं रं चांगभलं…' अशा भक्तिभावाने दख्खनचा राजा जोतिबाचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले. 'चांगभलं'चा अखंड जयघोष, गुलाल-खोबरे-दवण्याची उधळण, आकाशाला गवसणी घालणार्‍या सासनकाठ्या आणि विविधरंगी ध्वज अशा जल्लोषी वातावारणाने अवघा जोतिबा डोंगर परिसर न्हाऊन निघाला. निमित्त होतं दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेचे. प्रतिवर्षीप्रमाणे यात्रेच्या चार दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आदी राज्यांतून सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी उपस्थिती लावल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली.

संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने यात्रेची जय्यत तयारी केली होती. रस्त्याचे रुंदीकरण, मोठ्या संख्येने ठिकठिकाणी पार्किंग तळ, वाहतूक मार्गाचे व्यवस्थापन, गर्दीचे नियोजन अशा चौफेर नेटक्या नियोजनामुळे यात्रा सुरळीत आणि शांततेत संपन्न झाली. गेले महिनाभर वातावरणात प्रचंड उष्मा होता. मात्र यात्रेच्या मुख्य दिवशी म्हणजे मंगळवारी तुलनेने कमी असल्याने कालपर्यंत जाणवणार्‍या उकाड्याचा त्रास भाविकांना जाणवला नाही. यामुळे दुपारच्या भर उन्हातही भाविकांचा उत्साह कायम होता.

महाराष्ट्राची प्रगती होऊदे : जिल्हाधिकारी

जोतिबाच्या सासनकाठ्यांचे पूजन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी जोतिबा राजाला 'कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती होऊदे ', असे साकडे घातले. त्यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील निनाम पाडळी येथील सासनकाठी क्रमांक 1 या मानाच्या सासनकाठीचे पूजन झाले. यावेळी आमदार सतेज पाटील, आ. शंभूराज देसाई, अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवडणूक निरीक्षक रोहितसिंह, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रांत समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, देवस्थान समितीचे सचिव सुशांत किरण बनसोडे, धर्मादाय आयुक्त शिवराज नाईकवाडे, जोतिबा मंदिराचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले, सहा. व्यवस्थापक दीपक महेत्तर, अंबाबाई मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे उपस्थित होते.

SCROLL FOR NEXT