Latest

जुनी पेन्शन योजनेबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार : उपमुख्यमंत्री फडणवीस

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  जुनी पेन्शन योजना संदर्भात निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही. हा निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. दहा वर्षांत अडीच लाख कोटींवर हा खर्च जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले.
नागपूर शिक्षक मतदारसंघातील भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ स्मृती मंदिर रेशीमबाग येथे आयोजित एका सभेत ते बोलत होते.

यावेळी खासदार कृपाल तुमाने, निवडणूक प्रमुख आमदार मोहन मते, नागो गाणार यांच्यासह स्थानिक आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. गेले काही दिवस नागो गाणार यांनी एकच मिशन जुनी पेन्शन यावरून लक्ष वेधले होते. आजही त्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला. या संदर्भात फडणवीस बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने भाजपला या मुद्द्यावर उगीच बदनाम करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हा निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही असेच आपण वारंवार स्पष्ट केल्याचेही फडणवीस म्हणाले. शिक्षकांच्या प्रश्नावर लढणारा एक नेता आपल्या सोबत आहे. आमदार असो वा नसो त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर राहिलेत. हल्ली आमदारांचे दोन वर्षातच विमान आकाशात उडताना दिसते असा चिमटा फडणवीस यांनी काढला.

गडकरींना मिळालेल्या धमकीचा गांभीर्याने तपास करणार

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकीचा कॉल करण्यामागे नेमका कोणाचा हात आहे याचा गांभीर्याने तपास केला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. गडकरी यांच्या कार्यालयात आलेला कॉल ट्रेस करून गुन्हा दाखल केला आहे. कॉल करणार्‍या आरोपीने बेळगावच्या जेलमधून मोबाईल मिळवून हे कॉल केले आहेत. त्यामागे त्याचा हेतू काय आणि त्याच्या मागे आणखी कोणी आहेत का? याची पडताळणी पोलिस विभाग करेल, असे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT