Latest

जीडीपी दर चालू आर्थिक वर्षात ८.३ टक्क्यांवर : जागतिक बँक

Arun Patil

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी दर 8.3 टक्क्यांवर जाण्याचा अंदाज जागतिक बँकेने ताज्या अहवालात वर्तविला आहे. खासगी गुंतवणुकीत होत असलेली वाढ तसेच निर्मिती क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारकडून योजले जात असलेले उपाय यामुळे आगामी काळात भारतीय अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, अशी टिप्पणीही जागतिक बँकेने केली आहे.

देशात सेवा क्षेत्राची व्याप्‍ती मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, आता सरकारने निर्मिती क्षेत्रातही लक्ष घातले आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी दर 8.3 टक्क्यांवर जाऊ शकतो. तर, त्यापुढील वर्षात हा दर 7.5 टक्क्यांपर्यंत स्थिरावू शकतो, असेही जागतिक बँकेने अहवालात नमूद केले आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षात 9.5 टक्के जीडीपी दराचा अंदाज वर्तविलेला आहे.

दुसर्‍या सहामाहीत अर्थव्यवस्था वेगाने सावरली तर हा दर 10 टक्क्यांपर्यंतदेखील जाऊ शकतो, असे अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. कोरोना संकट बर्‍यापैकी नियंत्रणात आले असून, लसीकरणामुळे रुग्णसंख्या तसेच मृत्यूदरावर नियंत्रण आले आहे. यामुळे अर्थातच आर्थिक घडामोडी वाढल्या आहेत.

महागाईमुळे अडथळे

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असली तरी वाढती महागाई आणि पुरवठ्यातले अडथळे या बाबी मारक ठरत आहेत. वित्त क्षेत्रातले धोके अजूनही कायम असून, अनुत्पादक मालमत्तेत वाढ झाली तर त्याचा परिणाम साहजिकच बँकिंग व्यवस्थेवर होऊ शकतो, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. सरकारने पायाभूत सुविधांच्या उभारणीला प्राधान्य दिले आहे. यामुळे सरकारी खर्चात भरीव वाढ झाली आहे. दुसरीकडे खासगी गुंतवणूकदेखील पूर्वपदावर येऊ लागली आहे.

SCROLL FOR NEXT