Latest

जामीन मिळूनही दीड वर्षे तुरुंगात!

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : केवळ हमीदार सादर करू न शकल्यामुळे जामीन मिळाल्यानंतरही सुमारे दीड वर्षे तुरुंगात राहिलेला आरोपी सलीम अली मुन्ना अन्सारी याला अखेर उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी अन्सारीला ४० हजारांच्या रोख रकमेच्या जामिनावर कारागृहातून सोडण्याचा आदेश तुरुंग प्रशासनाला दिला.

आरोपी अन्सारीला यापूर्वी २२ नोव्हेंबर २०२१ रोजी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अन्सारी हा १२ सप्टेंबर २०१८ पासून तुरुंगात आहे. न्यायालयाने दीड वर्षांपूर्वी त्याला जामीन देताना ४० हजारांचा हमीदार देण्याची अट घातली होती. मात्र समाजात संपर्क नसल्यामुळे अन्सारीला तशा प्रकारचा हमीदार देणे कठीण झाले. परिणामी, जामीन मिळाल्यानंतर आणखी जवळपास दीड वर्षे त्याला तुरुंगात राहावे लागले. ही बाब निदर्शनास आणून देताना अॅड. अद्वैता लोणकर यांनी 'रूप नारायण विरुद्ध राजस्थान सरकार' प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ दिला. कठीण अटींची पूर्तता करता न आल्यामुळे आरोपीला शेवटपर्यंत तुरुंगात ठेवायचे का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणात उपस्थित केला होता.

अॅड. लोणकर यांनी अन्सारीसाठी हमीदाराची अट शिथिल करीत रोख रकमेवर तुरुंगातून सोडून देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करतानाच नोव्हेंबर २०२१ च्या 'आदेशातील इतर अटी कायम ठेवत न्यायमूर्ती कर्णिक यांनी अन्सारीचा अर्ज निकाली काढला. अन्सारीला कायदेशीर मदत करण्यासाठी न्यायालयाने अॅड. लोणकर यांची नेमणूक केली होती. त्यानुसार अॅड. लोणकर यांनी निशुल्क कायदेशीर मदत पुरवली.

SCROLL FOR NEXT