कोल्हापूर; एकनाथ नाईक : जिल्ह्यात मधुमेहाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. मधुमेहाच्या औषधांवर जिल्ह्यात दरमहा सुमारे पाच कोटी रुपये खर्च होत आहे. पाचपैकी एक व्यक्ती मधुमेहाची शिकार ठरत आहे.
टाईप 2, टाईप 1 पेक्षाही 'एलएडीए' (अॅटंट अॅटोईम्युन डायबेटीस ऑफ अॅटल्टहूड) हा प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळून येऊ लागला आहे. एलएडीए प्रकाराची सुरुवात वयाच्या 30 व्या वर्षापासून होत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
'एलएडीए' हा प्रकार तरुणांच्या स्वादुपिंडातील बिटापेशी नष्ट करतो. कालांतराने रुग्णास इन्सुुलीनची गरज भासते. कोणत्याही गोळ्यांनी अथवा औषधांनी अशा प्रकारच्या मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखर नियंत्रणात येत नाही. टाईप 2 ला 'एनआयडीडीएम' किंवा 'नॉन इन्सुलीन डिपेंड्स' असे म्हटले जाते. अशा प्रकारचे रुग्ण समाजात इतर मधुमेही प्रकारच्या तुलनेत 85 टक्के आढळतात. 30 ते 40 वर्षांमधील नागरिकांमध्ये या प्रकारचे मधुमेही रुग्ण आढळतात. इन्सुलीनवर (आयडीडीएम ) अवलंबून असलेला प्रकार म्हणजे टाईप 1 होय. सर्वसाधारपणे 10 टक्के रुग्णांत हा प्रकार आढळतोच. 1 ते 25 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये विशेषतः यांचे प्रमाण अधिक असल्याचे मधुमेहतज्ज्ञांनी सांगितले.
गरदोरपणात 5 टक्के महिलांना मधुमेह होण्याचा धोका असतो. याचे मुख्य कारण म्हणजे औषधांचे अतिसेवन होय. त्यामुळे स्वादुपिंडाला सूज येऊन त्यांना मधुमेह होतो. कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात 'स्टेरॉईड' गटातील औषधांचा वापर झाला. कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांचा मधुमेह नियंत्रणात आलेला नाही. बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार आदींमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे.
मधुमेहाची कारणे
अनुवंशिकता, स्थूलपणा, आहारातील बदल, व्यायामाची कमरता, मानसिक ताण, संसर्गजन्य आजार, मद्यपान, संप्रेरके व औषधांचे दुष्परिणाम, कुपोषणामुळे होणारा मधुमेह.
दुष्परिणाम
हाता-पायांच्या धमन्यांचे आजार, हृदयरोग व धमन्यांचे आजार, मेंदूच्या धमन्यांचे आजार, डोळ्यांच्या पडद्यांचा आजार, किडनीचा आजार, चेतासंस्थेचे आजार.
मधुमेही रुग्णांनी नियमित व्यायाम, प्राणायाम करणे गरजेचे आहे. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. त्यासाठी रुग्णांनी डॉक्टरांकडून व्यायामाचे वेळापत्रक तयार करून घ्यावे. अलीकडे मधुमेहातील 'एलएडीए' हा प्रकार तिशीतील तरुणांमध्ये वाढू लागला आहे. त्याची नेमकी कारणे काय? यावर संशोधन सुरू आहे. – डॉ. अनिलकुमार वैद्य