Latest

जागतिक आर्थिक परिषद : राज्यात 30 हजार कोटींची गुंतवणूक

Arun Patil

दावोस, स्वित्झर्लंड ; वृत्तसंस्था : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषद 2022 च्या वार्षिक बैठकीत दुसर्‍या दिवशी महाराष्ट्र लाउंजमध्ये झालेल्या सामंजस्य करारात एकूण रु. 30,379 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या करारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. या गुंतवणुकीमुळे सुमारे महाराष्ट्रात 66 हजार रोजगार निर्माण होणार आहेत.

विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी 23 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 उपक्रमांतर्गत दहाव्या आवृत्तीत झालेल्या गुंतवणूकीत 55 टक्क्यांहून अधिक गुंतवणूक ही सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान सारख्या देशांकडून थेट परकीय गुंतवणूकीच्या स्वरुपात आकर्षित करण्यात महाराष्ट्र यशस्वी ठरला आहे. यात प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, पॅकेजिंग, पेपर पल्प व अन्न प्रक्रिया, स्टिल, माहिती तंत्रज्ञान, डेटा सेंटर, लॉजिस्टिक इ. क्षेत्रांचा समावेश आहे.

राज्याच्या अर्थव्यवस्थेची क्षमता बळकट करण्यासाठी व व्यवसाय सुलभतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमाची संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत एकूण 10 आवृत्या आयोजित करण्यात आल्या, त्यामाध्यमातून आजतगायत 121 सामंजस्य करार झाले असून राज्यात एकूण 2.15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे, त्यात सुमारे 4 लाख रोजगार निर्मितीची क्षमता आहे.

याप्रसंगी पर्यावरण व हवामान बदल मंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर, महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे हे उपस्थित होते. यांच्यासह स्वाक्षरी करणार्‍या कंपन्यांचे उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.

कोविड काळातही महाराष्ट्रात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 या उपक्रमांतर्गत गेल्या 2 वर्षांत झालेल्या मागील 9 आवृत्त्यांमध्ये, 98 सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या. त्यापैकी 93 करार अंमलबजावणीच्या विविध टप्प्यात आहेत. हा औद्योगिक विकासाप्रती राज्याच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. याव्यतिरिक्त, कोव्हिड -19 च्या मागील दोन वर्षांत देशात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 26% गुंतवणूक झाल्याची माहिती यावेळी सुभाष देसाई यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT