Latest

जळत्या वर्तमानाची चिंता

अमृता चौगुले

गेल्या सुमारे दोन दशकांपासून देशाला आणि महाराष्ट्रालाही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांनी चिंताग्रस्त बनवले होते. मातीतून सोने पिकवणारा लाखाचा पोशिंदा बळीराजा मृत्यूला कवटाळत होता, तेव्हा सरकारपासून सामान्य माणसांपर्यंत सगळ्यांनाच अस्वस्थ करून सोडले होते. एखादी गोष्ट सातत्याने घडू लागली की, त्याची तीव्रता कमी होऊ लागते. त्यानुसार शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे हळूहळू समाजाला काही वाटेनासे झाले. प्रसारमाध्यमांमधील त्यांची जागाही हळूहळू आक्रसत गेली. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे हे असे वास्तव असताना कोरोना काळातील आत्महत्यांचे जे नवे वास्तव समोर आले आहे, ते केवळ हादरवून टाकणारेच नव्हे, तर आत्मचिंतन करायला भाग पाडणारे आहे. माणूस म्हणून आपण आपला जिवंतपणा टिकवायचा असेल, तर त्यासंदर्भात गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे एकीकडे आपण पुढच्या पंचवीस वर्षांचे नियोजन करताना आणि पंचवीस वर्षांनंतरचे गुलाबी चित्र पाहत असताना आपल्या पायाखालचा वर्तमान मात्र जळत आहे, याचे भान आपण गमावून बसलो आहोत. चहुबाजूंनी कोसळणार्‍या संकटांमुळे विविध घटकांचे जगणे किती मुश्कील बनले आहे, हेच यातून दिसते. कारण, शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, आता त्यात बेरोजगारांच्या आणि व्यावसायिकांच्या आत्महत्यांची भर पडली आहे. आत्महत्यांच्या प्रदेशात एकेक नवा समाजघटक प्रवेश करीत आहे, ही आजच्या काळातली चिंता तर आहेच शिवाय भविष्यात हा धोका वाढू नये, याचीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनीच राज्यसभेतील लेखी उत्तरात यासंदर्भात आकडेवारी दिली. त्यामुळे त्याबाबत शंका घेऊन त्याला राजकीय रंग देण्याचे कारण नाही. या माहितीनुसार 2018 ते 2020 या तीन वर्षांत बेरोजगारीमुळे 9 हजार 140, तर कर्जबाजारीपणामुळे 16 हजार 91 अशा एकूण पंचवीस हजारांहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या. कोरोनाकाळात 2020 मध्ये सर्वाधिक म्हणजे तीन हजार 548 बेरोजगारांनी मृत्यूला कवटाळले. 2018 मध्ये हा आकडा 2 हजार 741, तर 2019 मध्ये 2 हजार 851 इतका होता. कर्जबाजारीपणामुळे किंवा दिवाळखोरीमुळे 2018 या वर्षांत 4 हजार 970 लोकांनी आत्महत्या केल्या. 2019 मध्ये पाच हजार 908, तर 2020 मध्ये 5 हजार 213 लोकांनी मृत्यूला जवळ केले. 2018 नंतरच्या दोन वर्षांत व्यावसायिकांच्या आत्महत्यांमध्ये जी दुपटीहून अधिक वाढ झाली, त्यामागे कोरोना काळात ठप्प झालेले व्यवसाय, हिरावले गेलेले रोजगार आणि उदरनिर्वाहाची चिंता ही कारणे वरवर दिसतात. सरकारने डाळ, गहू, तांदूळ वगैरे जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता करून दिली; परंतु माणसाला जगण्यासाठी तेवढे पुरेसे नसते. जी माणसे चिवट असतात ती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही टिकून राहतात. 'महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती' असे संत तुकारामांनी म्हटले आहे, त्याची प्रचिती माणसाच्या चिवटपणातून येते. परंतु, सगळ्याच माणसांची घडण तशी नसते. माणसामाणसागणिक प्रवृत्ती आणि प्रकृती बदलत असते. काही लोक मनाने खंबीर नसतात. परिस्थितीनेच त्यांना तसे बनवलेले असते, ते संकटाने खचून जातात आणि नैराश्यातून मृत्यूला कवटाळतात.

खरे तर, या आत्महत्यांची जबाबदारी केवळ परिस्थितीवर आणि कोरोना काळावर टाकून समाज म्हणून आपल्याला नामानिराळे राहता येणार नाही. आत्महत्या वाढल्या म्हणून त्याचे खापर सरकारवर फोडून चालणार नाही. त्यासाठी शेतकरी आत्महत्यांच्या उदाहरणाकडे पाहावे लागेल. एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकाच्या प्रारंभीच शेतकरी आत्महत्यांचा विषय ऐरणीवर आला, तेव्हापासून सरकार त्यासंदर्भात उपाययोजना करीत आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळापासून शेती आणि शेतकर्‍यांसाठी कोट्यवधी रुपयांची पॅकेजेस दिली जात आहेत. शेतकरी कल्याणाच्या अनेक योजना जाहीर केल्या जात आहेत. राज्य सरकारांच्या पातळीवरही वेळोवेळी मदतीची पॅकेजेस आणि कर्जमाफीच्या घोषणा झाल्या, तरीसुद्धा शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नाहीत. एखाद्या वर्षात त्यांचे प्रमाण घटलेले दिसले, तरी त्यातील निरंतरता टिकून आहे. सरकारी पातळीवरून तसेच सामाजिक संघटना, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ अशा विविध घटकांनी त्यासंदर्भात विचार करून उपाययोजना सुचवल्या; परंतु फरक पडलेला नाही. हवामानाइतक्याच लहरी बाजारपेठेमुळे सतत असुरक्षित वातावरणात शेतकर्‍यांना राहावे लागते. पेरणी केल्यानंतर कधी पाऊस दगा देतो, पीक चांगले आल्यानंतर कधी अवकाळी पावसाचा दणका बसतो आणि सगळे नीट होते तेव्हा बाजारपेठ विश्वासघात करते. अशा अनेक संकटांशी सामना केल्यानंतरही शेतकर्‍यांच्या पदरात फारसे काही पडत नाही. कर्जबाजारीपणाचा ताण असह्य झाल्यानंतर काही लोक आत्महत्येचा मार्ग निवडतात. आत्महत्यांची आकडेवारी आणि त्यामागची वरवर दिसणारी अशी सगळी कारणे आपण गोळा करतो आणि त्यापासून समाज म्हणून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असतो. फार तर सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करून नागरिकाचे कर्तव्य पार पाडल्याचे समाधान मिळवतो. परंतु, त्यापलीकडे जाऊन नीटपणे विचार केला, तर असे दिसून येते की, माणसामाणसांमधील तुटलेला संवाद हे या आत्महत्यांचे खरे कारण आहे. एकमेकांच्या शेजारी राहणारी, कार्यालयात सोबत काम करणारी किंवा एकाच व्यवसायाच्या निमित्ताने जोडली गेलेली माणसे शरीराने एकत्र असली, तरी मनाने एकत्र असतातच असे नाही. सोशल मीडियावर शेकडो मित्र असतात; पण प्रत्यक्ष जगण्यात भीषण एकाकीपण असते. परस्परांना समजून घेण्याची प्रक्रियाच खंडित झाली आहे. कर्जबाजारीपणा, बेरोजगारी किंवा व्यावसायिक अपयश ही वरवरची कारणे असतात. जगण्याच्या कठीण काळात मनातले दुःख हलके करण्यासाठी, दिलाशाचे दोन शब्द देईल असे कुणी भेटत नाही. त्यातून मग काही लोक टोकाचे पाऊल उचलतात. अशा स्थितीत कोणत्याही पॅकेजच्या भरवशावर राहण्याऐवजी आपण माणूस म्हणून अधिक संवादी झालो, तर आत्महत्येकडे निघालेली पावले मागे फिरल्यावाचून राहणार नाहीत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT