मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जगातील सर्वात मोठे नागरी उपयोगातील विमान मंगळवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एअरबस बेलुगा नाव असलेल्या या अजस्त्र विमानाला पाहून विमानतळावरील प्रवासी आश्चर्यचकित झाले.
एअर बस कंपनीचे ए ३००- ६०० एसटी हे बेलुगा नावे ओळखले जाणारे विमान ५१ टन मालवाहू क्षमतेसह जगातील सर्वात मोठे विमान आहे. वैमानिक खाली व विमानाचा मुख्य भाग त्याच्या डोक्यावर तसेच खालील भागापेक्षा दुप्पटीने मोठी असलेली पाठ अशा अत्यंत वेगळ्या आकारातील हे विमान आहे. याशिवाय प्रवाशी वाहतुकीत जगात सर्वाधिक अत्याधुनिक असलेले एम्ब्रेअर ई १९५ ई २ हे विमान देखील मंगळवारी आले. आकर्षक रंगसंगतीसाठी हे विमान ओळखले जाते.
दरम्यान, नागरी उपयोगातील अन्तोनोव्ह कंपनीचे एएन १२४ व एएन २२५ ही दोन विमाने सर्वाधिक मोठी होती. या दोघांची सामान वाहून नेण्याची क्षमता अनुक्रमे १७१ व २५० टन आहे. या तोडीचे अन्य कुठलेही विमान आता पर्यंत अस्तिवात नव्हते. एएन २२५ विमानाने दिल्ली मेट्रोसाठीचे डबे आणले होते. ही दोन्ही विमाने भारतात विविध विमानतळावर येऊन गेली आहे.