Latest

जगात हिंदूंविरोधातील हिंसाचारात हजार टक्क्यांनी वाढ

Arun Patil

लंडन/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : जगभरात हिंदूंवरील हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जगात हिंदूंविरोधात द्वेष आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये 1 हजार टक्क्यांनी वाढ झाली असल्याचा धक्कादायक खुलासा नेटवर्क 'कंटेजिअन रिसर्च' या अमेरिकन संस्थेने अहवालातून केला आहे. संस्थेचे सह-संस्थापक जोएल फिंकेलस्टाइन यांनी सांगितले की, हिंदूंविरोधी मीम्स, द्वेष आणि हिंसाचाराचा अजेंडा तयार केला जात असून हे वाढविण्या मागे गौरवर्णीय आणि कट्टरपंथीय इस्लामिक तत्त्वे आहेत. गेल्या पाच वर्षांत हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियासारख्या देशात हिंदूंवरील हल्ले वाढले आहे. 'हिंदू फोबिया'च्या नावे कट रचला जात असल्याचा दावा फिंकेलस्टाइन यांनी केला आहे.

ब्रिटनमध्ये 30 वर्षांपूर्वी पाकिस्तानी दहशतवादी मसूद अजहरने जिहादी नेटवर्क तयार केले होते. 2005 मध्ये लंडनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांत अल कायदाचा हात असल्याचे समोर आले होते. या स्फोटांमध्ये 56 लोकांचा बळी गेला होता. दरम्यान अलीकडच्या काळात पाकिस्तान आणि बांगलादेशांमध्येही हिंदू मंदिरांवर हल्ले वाढले आहेत.

ब्रिटनच्या जेलमध्ये 18 टक्के मुस्लिम कैदी

ब्रिटनच्या संसदेत सादर केलेल्या एका अहवालानुसार, ब्रिटनमधील 7 कोटी लोकसंख्येत 4 टक्के मुस्लिम आहेत; मात्र गुन्हेगारीचा दर जास्त आहे. ब्रिटनच्या जेलममध्ये 18 टक्के मुस्लिम कैदी आहेत. ब्रिटन आणि वेल्सच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण केवळ 2 टक्के आहे; मात्र कोणत्याही हिंदूंविरोधात एकही गुन्हा दाखल नसून कोणीही जेलमध्ये बंद नसल्याचे अहवालात म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले

ब्रिटनमधील लिसेस्टर आणि बर्मिंघममध्ये झालेल्या हिंदू मंदिरांवरील हल्ल्यात पाकिस्तानी जिहादी संघटनांचा हात असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानचे जिहादी टेरर नेटवर्क ब्रिटनसह युरोपमध्ये जिहाद फैलावण्याच्या तयारीत आहेत. पाकिस्तानातील दहशतवादी ब्रिटनमध्ये आणून त्यांना मदरशांमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले जात असल्याचा दावा ब्रिटनमधील तपास यंत्रणांनी केला आहे.

सर्वाधिक हल्ले अमेरिकेत

अमेरिकेत 2020 मध्ये भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांवरील हल्ले 500 टक्क्यांनी वाढले आहे. यातील सर्वाधिक हिंदूधर्मीय आहेत, असा दावा अमेरिकन तपास यंत्रणा एफबीआयने केला आहे. दुसरीकडे ज्या देशात भारतीय जातात त्या देशाच्या विकासात हिंदू महत्त्वाचे योगदान देत असल्याचे उत्तर अमेरिकेतील एका हिंदू संघटनचे निकुंज त्रिवेदी यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT