Latest

जगभरात होत आहे ’प्लास्टिकचा पाऊस’!

Arun Patil

ऑकलंड : प्लास्टिकचे धुके किंवा पाऊस ही काही कल्पना नाही. हे एक भीषण वास्तव बनलेले आहे. अर्थात, आपण उघड्या डोळ्यांनी ते पाहू किंवा अनुभवू शकत नाही. त्याचा विशिष्ट स्वाद किंवा गंधही असत नाही; पण असा प्लास्टिक कणांचा पाऊस पडतो. न्यूझिलंडच्या ऑकलंड युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी म्हटले आहे की, ही एक गंभीर स्थिती आहे आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करीत आहोत.

'एन्व्हायर्न्मेंट सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ऑकलंड शहराच्या छतांवर प्रत्येक चौरस मीटरमध्ये एका दिवसात मायक्रोप्लास्टिकचे सरासरी 5 हजार कण पडतात. याचा अर्थ वर्षभरात 74 टन प्लास्टिक जमा होते.

हे 30 लाख प्लास्टिक बाटल्यांइतके प्रमाण आहे. अशाच प्रकारचे संशोधन 2020 मध्ये ब्रिटनमध्येही झाले होते. त्यामध्ये अनुमान लावले होते की, लंडनमध्ये एकाच आकाराच्या पॅचवर मायक्रोप्लास्टिकचे सरासरी 771 कण पडतात. हे ऑकलंडच्या तुलनेत सहा पट कमी प्रमाण आहे; मात्र याचा अर्थ असा नाही की, लंडनमध्ये प्रदूषण कमी आहे. प्लास्टिकच्या सर्वात छोट्या कणांना मोजले गेले नसल्याने हा आकडा कमी आहे.

वैज्ञानिकांनी म्हटले आहे की, आता पावसाचे पाणी, समुद्र, खाद्यपदार्थ आणि अन्नसाखळीतही मायक्रो प्लास्टिक समाविष्ट झालेले आहे. ऑकलंडमध्ये जे कण आढळले त्यांचा आकार 10 ते 50 मायक्रोमीटर होता. केवळ 3 टक्के कणांचा आकारच 100 मायक्रोमीटरपेक्षा अधिक होता. हे कण मानवाच्या तसेच अन्य सजीवांसाठीही हानिकारक ठरतात.

SCROLL FOR NEXT