Latest

चेतेश्वर पुजारा याचा इंग्लिश कौंटीत धुमाकूळ

Arun Patil

लंडन ; वृत्तसंस्था : कसोटी क्रिकेटमधील खराब कामगिरीमुळे कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याला भारतीय संघातून वगळण्यात आले असले तरी इंग्लंडमधील कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन दोनमधील एका सामन्यात ससेक्सकडून खेळताना त्याने घणाघाती शतक ठोकले आहे. एवढेच नव्हे तर आपल्या संघाचा पराभव टाळण्यातही तो यशस्वी ठरला आहे.

यातील विशेष बाब अशी की, भारतीय संघाला जुलैमध्ये इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायचा आहे. पुजाराने आपला फॉर्म कायम ठेवला तर, पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात त्याचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिका दौर्‍यानंतर भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलेल्या पुजाराने 248 चेंडूंत 16 चौकारांच्या मदतीने 115 धावा केल्या. त्याने कर्णधार आणि सलामीवीर टॉम हेन्स (नाबाद 205, 386 चेंडू, 20 चौकार) सोबत तिसर्‍या विकेटसाठी 232 धावांची अखंड भागीदारी केली. त्यामुळे ससेक्सने दुसर्‍या डावात 2 बाद 377 धावा केल्या.

प्रथम दर्जाच्या सामन्यात चेतेश्वर पुजारा याने झळकावलेले हे 51 वे शतक आहे. या सामन्यापूर्वी त्याने 226 लढतींतील 374 डावांमध्ये 51 च्या सरासरीने 16948 धावा केल्या होत्या. या कामगिरीसह पुजाराने 17 हजार धावांचा टप्पा सर केला आहे. यात 50 शतके आणि 70 अर्धशतकांचा समावेश आहे. 352 धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होय. त्याने भारतासाठी 95 कसोटी सामन्यांत 44 च्या सरासरीने 6713 धावा केल्या आहेत. यात 18 शतके आणि 32 अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 206 धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT