Latest

चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट नाकारली

Arun Patil

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : चीनचे परराष्ट्रमंत्री यांग यी 24 मार्च रोजी भारत दौर्‍यावर होते. 25 मार्च रोजी त्यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी, नंतर परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याशी चर्चा केली. वांग यी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भेटायचे होते; पण यी यांना त्यासाठी नम्रपणे नकार देण्यात आला.

एक तर लखनौत योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींना 25 मार्च रोजी उपस्थित राहायचे होते. दुसरे म्हणजे, वांग यी यांचा हा दौराही तसा अघोषित होता. वांग हे 2 वर्षांनंतर नवी दिल्लीत आले होते. चिनी परराष्ट्रमंत्री वांग यी यांची त्यांचे समकक्ष भारतीय परराष्ट्रमंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याशी भेट झालेलीच होती. ही झाली तांत्रिक कारणे; मात्र वांग यी यांना भेट नाकारून एकप्रकारे पंतप्रधान निवासस्थानाने सीमेवरील चीनच्या भूमिकेचा निषेधच नोंदविल्याचे मानले जात आहे.

स्वत: जयशंकर यांनी यासंदर्भात सांगितले की, चीनशी द्विपक्षीय करार नसल्यामुळे आम्ही आमच्या बाजूने ही भेट जाहीर केली नाही. भारत आणि चीनमधील संबंधही सामान्य नाहीत. मोठ्या संख्येने चीनने भारताच्या सीमेवर सैन्य तैनात केलेले आहे. पँगाँग सरोवराचा भाग वगळता अन्य समस्यांच्या निराकरणात फारशी प्रगती झालेली नाही. जोवर सीमेवर परिस्थिती सामान्य होत नाही, तोवर द्विपक्षीय संबंधांत आपण पुढे सरकू शकणार नाही, असे आम्ही वांग यी यांना स्पष्टच सांगितले आहे.

SCROLL FOR NEXT