Latest

चार्जिंग : आता हवेनेच होणार विविध उपकरणांचे चार्जिंग!

अमृता चौगुले

टोकियो ः लवकरच आपला लॅपटॉप किंवा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी चार्जर, प्लग, केबल आणि पोर्टची गरज लागणार नाही. खोलीत ठेवलेली उपकरणे आपोआपच चार्ज होतील. जपानी संशोधकांनी त्यासाठी एक वायरलेस चार्जिंग रूम तयार केली आहे, या खोलीतील हवेच्या सहाय्यानेच गॅझेटस् चार्ज होतील.

संशोधकांनी म्हटले आहे की हे एक असे अद्ययावत तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये इलेक्ट्रिक फिल्डशिवायच (विद्युत क्षेत्र) मॅग्नेटिक फिल्ड (चुंबकीय क्षेत्र) निर्माण केले जाऊ शकते. खोलीतील चुंबकीय क्षेत्रामुळे तिथे असलेल्या माणूस किंवा प्राण्याला कोणताही धोका असणार नाही. दहा बाय दहा फुटांच्या या वायरलेस चार्जिंग रूमची चाचणीही घेण्यात आली आहे. माणसाला कोणताही धोका न पोहोचवता मॅग्नेटिक फिल्डच्या गाईडलाईन्सनुसार ही खोली 50 वॉटपर्यंतची ऊर्जा निर्माण करू शकते. ही खोली म्हणजे एकप्रकारे वायरलेस चार्जिंग पॅडसारखीच आहे. विशेष म्हणजे इथे चार्जिंग पॅडची मात्र गरज भासत नाही. ही वायरलेस रूम बनवण्यासाठी अ‍ॅल्युमिनियम टेस्ट रूम बनवण्यात आली आहे. तिथे पॉवर लॅम्प, फॅन आणि मोबाईल फोन वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून चार्ज करण्यात आले.

व्यावसायिकद़ृष्ट्या अशी वायरलेस चार्जिंग रूम तयार करण्यासाठी किती खर्च येणार हे आताच सांगता येणे कठीण आहे. याचे कारण हे तंत्र अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामध्ये अनेक सुधारणा होऊन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही वर्षे लागतील. काही संशोधकांचे म्हणणे आहे की अशा चार्जिंगमध्ये मॅग्नेट आणि कॉईलचा वापर केला जातो. ज्या रुग्णांच्या हृदयात पेसमेकर व अन्य उपकरणे बसवलेली आहेत, ती यामुळे बंद पडू शकतील. मात्र, संशोधक अ‍ॅलेन्सन सॅम्पल यांनी सांगितले की यामध्ये असे होण्याचा धोका कमी आहे. आम्ही जी रूम तयार केली आहे तिच्यामध्ये मॅग्नेट म्हणजेच चुंबकाचा वापर स्थायी स्वरूपात केलेला नाही. त्यामुळे त्यापासून मानवी आरोग्यास धोका नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT