Latest

चांदोली पर्यटन क्षेत्रात होणार ‘क्रोकोडाईल पार्क’

Arun Patil

इस्लामपूर ; मारुती पाटील : जैवविविधतेने नटलेल्या चांदोली पर्यटन क्षेत्रात 'क्रोकोडाईल (मगर) पार्क' उभारण्यात येणार आहे. त्यामुळे चांदोलीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. शिवाय हे क्षेत्र पर्यटकांसाठी चांगले 'डेस्टिनेशन' बनून पर्यटनाला आणखी चालना मिळणार आहे.

चांदोली अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे पर्यटन क्षेत्र आहे. त्यामुळे येथे पर्यटनवाढीसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे. मागील महिन्यातच पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत चांदोलीत 'क्रोकोडाईल पार्क' उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या पार्कचा सविस्तर आराखडा तयार करून शासनाला सादर करण्याचे आदेश त्यांनी वन व पाटबंधारे विभागाला दिले आहेत.

'क्रोकोडाईल पार्क' मुळे या पर्यटनस्थळाचा आणखी विकास होणार आहे. हा आराखडा तयार करताना तो पर्यावरणपूरक असावा यासाठी प्रयत्न केले जातील, असे आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

या पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ अधिकार्‍यांची समिती आधी चांदोली धरण परिसराची पाहणी करून वारणा नदीपात्रात जागा निश्‍चित करणार आहे. त्यानंतर या पार्कचा सविस्तर आराखडा तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

पर्यटकांना मगरी पाहता याव्यात यासाठी मनोर्‍यांची उभारणी, बोटिंगची सुविधा यांचा यामध्ये समावेश असणार आहे. गेल्या काही वर्षांत कृष्णा – वारणा नदीपात्रात मगरींची संख्या वाढली आहे. अनेक बळीही मगरींनी घेतले आहेत. लोकवस्तीकडे येणार्‍या मगरी पकडून त्या या पार्कमध्ये सोडता येणार आहेत. महाराष्ट्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर चांदोलीतच हा पार्क होणार असल्याने याबाबतची पर्यटकांची उत्सुकता आणखी वाढणार आहे.

टुरिझम मॉडेल विकसित होणार…

या क्रोकोडाईल पार्कबरोबरच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी 'चांदोली- वारणा' पर्यावरणपूरक ट्युरिझम मॉडेलही तयार करण्यात येणार आहे. या मॉडेलमध्ये रिसॉर्ट्स, हॉटेल्स, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस, वॉटर स्पोर्टस, बॉटनिकल गार्डन यांचा समावेश करण्यात येणार आहे. होम स्टेचीही सुविधा या ठिकाणी करण्यात येणार आहे. तसेच चांदोली परिसरात मिळणारा स्थानिक रानमेवा व शेतीपूरक माल विक्रीची सोय व्हावी, असेही नियोजन या मॉडेलमध्ये करण्यात येणार आहे.

आराखडा कागदावर राहू नये…

चांदोली अभयारण्य हे जैवविविधतेने नटलेले आहे. येथे नाना प्रकारच्या वनस्पतींबरोबरच पट्टेरी वाघ, बिबटे, गवे, सांबर, चितळ, रानडुक्कर असे प्राणी तसेच विविध जातींच्या पक्षीही आहेत. आता क्रोकोडाईल पार्कमुळे या वैभवात आणखी भर पडणार आहे. मात्र, हा प्रकल्प कागदावर न राहता गतीने प्रत्यक्षात यावा, अशी लोकांची अपेक्षा आहे.

SCROLL FOR NEXT