Latest

चला पर्यटनाला : जुना पन्हाळा : ट्रेकिंगचे आकर्षण; गिरीलिंग डोंगराने सर्वत्र परिचित

दिनेश चोरगे

कवठेमहांकाळ; गोरख चव्हाण : जुना पन्हाळा कवठेमहांकाळ-मिरज तालुक्याच्या मध्यभागी कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथे आहे. जुना पन्हाळा हा गिरीलिंग डोंगर म्हणून सर्वत्र परिचित आहे. या भागातील गिरीलिंग डोंगर म्हणजे एक दिवसाचा पिकनिक स्पॉट, ट्रेकिंगसाठी आकर्षण ठरला आहे.

दोन तालुक्याच्या सीमेवर असलेल्या गिरीलिंग डोंगर (जुना पन्हाळा) वर पठाराच्या दोन टोकाला दोन मंदिरे मात्र हमखास पाहण्यासारखी आहेत. एका टोकाकडील मंदिरातून दुसर्‍या टोकाकडील मंदिरात जाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटरची पायपीट करावी लागते. कुकटोळी गावाच्या बाजूला गिरीलिंग मंदिर तर बेळंकी गावाकडे डोंगरात तीन नैसर्गिक गुहा असणारे गडसिद्ध मंदिर आहे. दोन्ही मंदिरे व या किल्ल्याचे बेळुंखी गावाकडील पठारावरील भिंतसदृश अवशेष पाहण्यासाठी एक संपूर्ण दिवस लागतो.

कुकटोळी गावातून गिरीलिंग मंदिरापर्यंत कच्चा गाडीरस्ता (दुचाकीसाठी) आहे. जांभ्या दगडाला टेकून हेमाडपंथी शैलीतील मंदिर पाहून मन प्रसन्न होते. मंदिराच्या बांधणीवरून अंदाजे ते 13 व्या शतकातील असावे, असे म्हणतात. मंदिर परिसरात काही गुहा आहेत. त्या गुहांमध्ये काही चौकोनी खांब व एक शिवलिंग आहे. या ठिकाणी प्राचीन लेण्याही दिसतात. इथल्या मुख्य गिरीलिंग मंदिराला मध्यभागी रंगशिळा आहे. दर्शनी बाजूला व भिंतीमध्ये काही ठिकाणी ओटे बांधलेले आहेत. मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिराच्या सभामंडपात गणपती, महिषासुरमर्दिनी, हनुमान व नागाच्या मूर्ती स्थापन केलेल्या असून खांब देखील आहेत.

आत एका वेगळ्या गुहेमध्ये गिरीलिंग (शिवलिंग) स्थापन केले आहे. मुख्य मंदिरासमोर एका गुहेत इथल्या महाराजांचे घरवजा निवासस्थान आहे. त्याच्या जवळूनच किल्ल्यावर जाणार्‍या पायवाटेने 5 मिनिटांत आपण किल्ल्याच्या 500 एकराच्या पठारावर येतो.

कसे जाल…..

मिरज ते कुकटोळी अंतर 30 किमी (मार्ग मिरज-खंडेराजुरी- कुकटोळी)
कवठेमहांकाळ ते कुकटोळी 11 किमी. (मार्ग कवठेमहांकाळ- हिंगणगाव-कुकटोळी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT