Latest

चक्क इमारतींमध्ये ध्रुवीय अस्वल!

Shambhuraj Pachindre

मॉस्को : पांढर्‍या, ध्रुवीय अस्वलांची अनेक छायाचित्रे आपण आजपर्यंत पाहिलेली असतील. ही सर्व छायाचित्रे अर्थातच ध्रुवीय प्रदेशातील, बर्फावरील असतात. मात्र, आता अशा अस्वलांची चक्क घरांमधून डोकावत असलेली छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. आर्क्टिक म्हणजेच उत्तर ध्रुवावरील बेटावर असलेल्या निर्जन घरांमध्ये घुसलेली ही अस्वलं आहेत. पोर्चमध्ये उभे राहिलेली किंवा खिडकीत उभे राहून बाहेर पाहत असलेली ही अस्वलं यामध्ये दिसतात.

एका रशियन फोटोग्राफरने त्यांची छबी कॅमेर्‍यात टिपून घेतली. दीमित्री कोख नावाच्या या फोटोग्राफरने 2021 च्या उन्हाळ्याच्या शेवटी रशियाच्या उत्तरेकडील चुकोत्का भागाचा प्रवास केला. तेथील रँजेल आयलंडवर आपल्याला ध्रुवीय अस्वलांची छायाचित्रे टिपता येतील असा त्याचा होरा होता. जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट असलेल्या या ठिकाणाला युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनकडून संरक्षण मिळालेले आहे.

आर्क्टिक वर्तुळाच्या वर असलेल्या या ठिकाणी ध्रुवीय अस्वलं नेहमी पाहायला मिळत असतात. मात्र, यावेळी ती त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नव्हे तर चक्क मानवी निवार्‍यांमध्ये दिसून आली. रँजेल आयलंडच्या दक्षिणेस असलेल्या कोल्युचिन आयलंड या बेटावर एके काळी सोव्हिएत वेदर स्टेशनच्या काही इमारती आहेत. या हवामान केंद्राच्या निर्जन इमारतींमध्ये वीसपेक्षाही अधिक अस्वलांचा मनसोक्त वावर सुरू होता असे दीमित्री यांना आढळले. त्यांना अशा अनपेक्षित ठिकाणी पाहून दीमित्री यांनी त्यांची अनेक छायाचित्रे टिपून ती इन्स्टाग्राम व त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटवर शेअर केली.
­­

SCROLL FOR NEXT