चंदगड; पुढारी वृत्तसेवा : चंदगड तालुक्यात तिलारीनगरनजीकच्या बांद्राईवाडा धनगरवाड्यातील एका घरात मध्यरात्री कुत्र्याचा पाठलाग करीत बिबट्या थेट घरात शिरला. अचानक घरात शिरलेल्या बिबट्याला पाहून सार्यांची भंबेरी उडाली. प्रसंगावधान राखून घरातील सर्व लोकांनी बाहेर येऊन बिबट्याला घरात जेरबंद केले. मात्र, पाठीमागील कमजोर दरवाजा मोडून बिबट्याने पलायन केले. मंगळवारी मध्यरात्री हा थरारक प्रकार घडला.
बांद्राईवाडा येथील रामू भागू लांबोर यांचा पाळलेला कुत्रा घराच्या परिसरात फिरत असताना जंगलातून आलेल्या बिबट्याने कुत्र्याचा पाठलाग केला. यावेळी कुत्र्याने घराकडे धाव घेत स्वयंपाकखोलीत आसरा घेतला. पाठोपाठ बिबट्याही घरात शिरला. यावेळी कुत्र्याने पुन्हा घराबाहेर पलायन केले.
दरम्यान, बिबट्या दिसताच रामू यांच्यासह पत्नी साऊ, मुलगी निकिता व मुलगा सुभाष हे दोन वर्षाचा मुलगा व सहा महिन्यांच्या बाळासह घराबाहेर पडले आणि तत्काळ त्यांनी घराचा समोरील दरवाजा बंद केला.
जेरबंद झालेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाला पाचारण करण्यात आले. वन विभागाचे पथक दाखल झाल्यानंतर बॅटरीच्या सहाय्याने घरांच्या खिडक्यांतून शोध घेतला असता बिबट्या दिसून आला नाही. कमजोर असलेल्या दरवाजाच्या फटीतून बिबट्याने पलायन केल्याचा अंदाज आला.
बिबट्याने पलायन केल्याने वन विभागाला माघारी फिरावे लागले. यापूर्वी या परिसरात बिबट्याने अनेक म्हशी, गायी आणि कुत्र्यांवर हल्ले केले आहेत. त्यामुळे बिबट्याच्या वास्तव्याने घबराटीचे वातावरण पसरले आहे.