वॉशिंग्टन : चोरांच्या किंवा चोरीच्याही अनेक अनोख्या घटना जगभरात घडत असतात. अमेरिकेत नुकतीच अशी एक घटना घडली. न्यू मेक्सिकोमध्ये एका घरात घुसलेल्या सशस्त्र चोराने घरात आंघोळ केली तसेच खाणे-पिणे केले आणि चक्क एक झोप काढून तो निघून गेला. जाताना त्याने घरमालकालाच 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे पंधरा हजार रुपये दिले!
या चोराला आता पकडण्यात आले असून 34 वर्षांच्या या चोराचे नाव तेराल क्रिस्टेशन असे आहे. 30 जानेवारीला या चोराने एका बंद घराची खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. त्याच्याजवळ एआर-15 रायफल होती. त्याने घरात कशाचीही चोरी केली नाही. घरमालक घरात आल्यावर त्याने त्याची माफी मागितली व खिडकी तोडल्याबद्दल 200 डॉलर्स दिले. आपल्याला झोपण्यासाठी ऊबदार जागा हवी होती, म्हणून आपण आलो होतो असे त्याने सांगितले.
घरमालकाने सांगितले की घरातून जाण्यापूर्वी त्याने आपली कहाणीही सांगितली. पूर्व टेक्सासमध्ये त्याच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली असून तो हल्लेखोरांपासून लपूनछपून राहत असल्याचे त्याने सांगितले. जवळच आपली कार खराब झाल्याने तो या घरात घुसला होता.
दुसर्याच दिवशी पोलिसांना जबरदस्तीने केलेल्या कार चोरीची तक्रार मिळाली. या चोराचे वर्णन घरात घुसलेल्या चोराशी मिळतेजुळते होते. रस्त्यावरून जात असताना या चोराला पकडण्यात आले.