Latest

‘ग्लोबल टीचर’च्या कर्तृत्वावर शिंतोडे उडवले अन् लोहार फसला!

Arun Patil

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : शिक्षकांच्या बदल्या, निविदा कामांत टक्केवारीचा मलिदा लाटणारा लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार याने 'आंतरराष्ट्रीय ग्लोबल टीचर' पुरस्कारप्राप्त रणजित डिसले यांच्या कार्यकर्तृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे करीत त्यांच्यावर शिंतोडे उडवले होते.

माढा तालुक्यातील परितेवाडी येथील ग्लोबल टीचर पुरस्कारप्राप्त रणजित डिसले यांना शिक्षणाधिकारी डॉ. लोहार याने अनेक कारणांनी डसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, याप्रकरणी थेट तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनीच लक्ष घातल्याने लोहारचा प्रयत्न फसला.

डिसले यांची प्रतिनियुक्ती वेळापूर (ता. माळशिरस) येथील जिल्हा प्रशिक्षण संस्थेत होती. या संस्थेत डिसले यांनी तीन वर्षांत काम न करताच 17 लाखांचा पगार घेतला, अशी भूमिका लोहारने घेतली व डिसलेंवर कारवाई करण्याच्या हालचालीही सुरू केल्या.

डिसले गुरुजींना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतील काही रक्कम लोहारने मागितल्याचा आरोप डिसले यांनी केला होता. शिवाय, लोहारसह काही अधिकार्‍यांच्या जेवणावळीचे पैसेही डिसलेंसह काही शिक्षकांनी वर्गणी काढून दिले होते, असा दावा डिसलेंनी काही वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला होता. याचा राग लोहारच्या मनात होता. डिसलेंवर सूड उगवण्यासाठी किरण लोहारने छुपी मोहीम सुरू केली होती. डिसले यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत लोहारने शंका उपस्थित केली होती. काम न करता पगार घेतल्याचा ठपका ठेवत डिसले यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला होता; पण तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आदेशानंतर कारवाईचा आदेश मागे घ्यावा लागला होता.

रजेसाठीही मंत्रालयात धाव

डिसले यांना अमेरिकेतील फुलब्राईट शिष्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणासाठी अमेरिकेला जाण्यासाठी सहा महिन्यांची रजा मागितली. मात्र, लोहारने ही रजा नाकारली. या प्रकरणातही थेट मंत्रालयातून आदेश आल्यावर डिसले यांना ही रजा मंजूर करण्यात आली.
(क्रमश:)

लोहारचे पितळ उघडे पडल्याने शिक्षकांत समाधान!

आंतरराष्ट्रीयस्तरावरील पुरस्कार पटकावणार्‍या शिक्षकाचा अपमान करणे, शाळा तपासणीसाठी गेल्यावर शिक्षकांबद्दल अवमानकारक बोलणे आदी प्रकारामुळे शिक्षणाधिकारी लोहार याच्याविरोधात शिक्षकांत प्रचंड रोष होता. त्यामुळे उघड लाचखोरीचा प्रताप करणार्‍या लोहारचे पितळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने उघडे पाडल्याने शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT