Latest

ग्रामपंचायत निवडणुका बीड जिल्‍ह्यात अन् ऊस तोडणी विस्कळीत कोल्हापूर जिल्ह्यात!

निलेश पोतदार

गुडाळ ; आशिष पाटील : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे ऊस तोडणी करणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या बहुतांश टोळ्या बीड जिल्ह्यातील आहेत. बीड जिल्ह्यामध्ये रविवारी तब्बल 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकात मतदान करण्यासाठी बहुतांश ऊस तोडणी कामगार आज (शनिवार) आपआपल्या गावी रवाना झाले. यामुळे कामगारांअभावी जिल्ह्यातील ऊस तोडणी यंत्रणा तीन दिवस विस्कळीत होणार आहे.

बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यात सातशेचार ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. स्थानिक पातळीवर चुरशीने निवडणुका होत असल्याने एक-एक मताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहजिकच ऊस तोडणी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असलेल्या गावातील ऊस तोडणी कामगारांना मतदानाला आणण्यासाठी स्थानिक आघाड्यांनी मोठी यंत्रणा लावली आहे. ऊस तोडणी कामगारांना गावी आणण्यासाठी खास वाहनांची व्यवस्था केली आहेच. शिवाय तीन दिवसांच्या बुडणाऱ्या मजुरीची भरघोस भरपाई देण्याची व्यवस्थाही केल्याचे ऊस तोडणी मजुरांकडून सांगण्यात आले.

त्याशिवाय बहुमोल मतदानासाठी वेगळे मोलही मोजण्यात आले आहे. जिल्ह्यातील गावा-गावातून बीड जिल्ह्यातील ऊस तोडणी मजुरांच्या गाड्या आज (शनिवार) मतदानासाठी आपल्या गावी रवाना झाल्या. रविवारी मतदान करून सोमवारीच हे ऊस तोडणी मजूर पुन्हा कामावर रुजू होणार आहेत. मतदानासाठी गावी गेलेले सर्वच्या सर्व मजूर पुन्हा टोळीत परततील ना? याचीही धास्ती लाखो रुपये अ‍ॅडव्हान्स दिलेल्या वाहनधारकांना आहे. एकंदरीत निवडणूक बीड जिल्ह्य़ात आणि ऊसतोडणी विस्कळीत कोल्हापूर जिल्ह्यात असेच चित्र सध्या पहायला मिळत आहे.

ऊस तोडणीचे काम तीन दिवस बंद असले, तरी कामगारांना त्याची भरपाई मिळेल. मात्र ऊस वाहतुकीची वाहने फडात थांबून राहिल्याने वाहनधारकांना मात्र आर्थिक फटका बसणार आहे.
टी. आर. पाटील (गुडाळकर) ट्रकमालक

SCROLL FOR NEXT