Latest

गोवा : प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाचा आज शपथविधी; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय नेत्यांची मांदियाळी

मोनिका क्षीरसागर

पणजी : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आज, सोमवारी (दि.28) डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमममध्ये सकाळी 11 वाजता होत आहे. गोव्याच्या इतिहासात हा शपथविधी पहिल्यांदाच अभूतपूर्व असा होणार आहे. डॉ. सावंत हे दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्रिमंडळात कोण-कोण मंत्री असतील, कोण मंत्री म्हणून शपथ घेणार याबाबत पक्षाकडून गुप्तता पाळण्यात आली असली, तरी सध्या विविध नावे चर्चेत आली आहेत.

या सोहळ्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोवा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी यांच्यासह भाजपशासीत नऊ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यास पंतप्रधान उपस्थित राहण्याची ही गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरणार आहे.

यामुळे डॉ. सावंत यांचा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरणार असल्याची चर्चा आहे, हा सोहळा सर्वांसाठी खुला असल्यामुळे या सोहळ्यास अंदाजे 10 हजारांपेक्षा अधिक नागरिक उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी केवळ गोवातूनच नव्हे तर, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, दिल्ली आदी राज्यातील लोक उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची सर्वतोपरी तयारी पक्षाने केली आहे.

राजधानी पणजीच्या जवळील बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये होत असलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी गोव्यात दाखल झाले आहेत.
मुख्यमंत्री डॉ. सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानावडे, संघटनमंत्री सतीश धोंड यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. हा सोहळा न भूतो न ठरता न भविष्यति, व्हावा यासाठी पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अहोरात्र काम करत आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 18 दिवस झाले. देशातील 5 राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी चार राज्यांत भाजपाने यश मिळवले. संपूर्ण देशासह गोव्यात होणारा शिगमोत्सव आणि होळी यामुळे इतर राज्यांतील शपथविधी सोहळा थोडा विलंबाने पार पडला. गोव्यातही शिगमोत्सवामुळे शपथविधी काहीसा उशिरा होत आहे.
या निवडणुकीत गोमंतकीय जनतेने भाजपला विधानसभेच्या एकूण 40 पैकी 20 जागांवर विजयी केले असून, भाजपच्या सरकारला तीन अपक्ष आणि 2 आमदार असलेल्या मगो पक्षाने बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपचे सरकार असल्याने राज्यातही पुढील पाच वर्षांसाठी भाजपचे डबल इंजिन सरकार कार्यरत राहणार आहे.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या शपथविधी सोहळ्यास तत्कालीन उपराष्ट्रपती झाकीर हुसेन उपस्थित राहिले होते. तो सोहळा वगळता गेल्या 60 वर्षांत मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यास राष्ट्रीय नेते किंवा मान्यवर उपस्थित नव्हते. म्हणूनच डॉ. सावंत यांचा शपथविधी सोहळा आगळा वेगळा ठरतो.

मंत्रिपदासाठी चर्चेतील नावे

नियमानुसार मुख्यमंत्री वगळता 11 मंत्री घेण्याची संधी सरकारला आहे. मात्र, या 11 जागांसाठी 15 आमदार उत्सूक असल्याने नेमके कोणते निकष लावून मंत्रिपद दिले जाते हे कळण्यास मार्ग नाही. प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्रिपद देण्याबाबत भाजपचे केंद्रातील नेते निर्णय घेतील, अशी सांगितले आहे. त्यामुळे भाजप सरकारमधील मंत्र्याची नावे दिल्लीत नक्की झाली असणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कोणाची वर्णी मंत्रिमंडळात असेल, ते शपथविधी सोहळ्यातच दिसणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, रवी नाईक, सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे, निलेश काब्राल, बाबूश मोन्सेरात, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई व नीळकंठ हळर्णकर या भाजप आमदाराची नावे मंत्रिपदासाठी चर्चेत असून अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड व डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्यासह लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून मगो आमदार सुदिन ढवळीकर यांचाही मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT