Latest

गोवा : पार्ट्या रडारवर, किनारे तूर्तास शांत; मोरजीतील पार्टी आयोजकांना भोवली

दिनेश चोरगे

पेडणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सर्व किनारपट्टीवरील रात्रीच्या पार्ट्या पोलिसांसह सर्व सरकारी यंत्रणांच्या रडारवर आहेत. रात्री 10 नंतर ध्वनिक्षेपक बंदच करावयाचा असा न्यायालयाचा आदेश आहे. त्यामुळे सर्व सरकारी यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मोरजीत शनिवारी रात्री 2 वाजेपर्यंत चाललेली पार्टी पोलिसांनी बंद पाडली. तसेच एकाला अटक केले. पार्ट्यांच्याबाबत सरकारने कठोर भूमिका घेतल्यामुळे बारदेश आणि पेडणे तालुक्यातील समुद्रकिनारे शांत झालेले आहेत. वाद्यांचा उत्तर रात्रीपर्यंत चालणारा दणदणाट आणि पर्यटकांचा धिंगाणा यंदाच्या डिसेंबरमध्ये असणार नाही, अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे वर्षा अखेरीस निरोप देण्यासाठी तसेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी दरवर्षीचा 'माहोल' यंदा असण्याची शक्यता कमी असेल. त्यामुळे व्यावसायिकांना कोट्यवधीचा फटका बसू शकतो तसेच पर्यटकांच्या संख्येवरही परिणाम होऊ शकतो.

मोरजी येथील मारबेला बीच रिसॉर्ट येथे शनिवारी (दि.3 रोजी) रात्री 10 वा. नंतर संगीत रजनी सुरू ठेवून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी व मोठमोठ्याने ध्वनिक्षेपक वाजवून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी रिसॉर्टवर गुन्हा दाखल केला. तसेच ध्वनिक्षेपक जप्त करण्यात आला असून, एकाला अटक केल्याची माहिती पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली.

दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानंतरही शनिवारी रात्री उशिरापर्यंत पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे या किनारी भागात संगीत रजनी सुरू होत्या. याबाबतच्या अनेक तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचल्या; परंतु त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी झाली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

याविषयी पेडणे पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्याकडे संपर्क साधला असता मोरजी येथे शनिवारी रात्री 10 वा. नंतरही संगीत रजनी सुरू होती. त्या रिसॉर्टवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. इतर ठिकाणी अशा संगीत रजनी सुरू असतील, तर नागरिकांनीही पोलिसांकडे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

शनिवारी ज्या ठिकाणी रात्री 10 वा. नंतर संगीत रजनी सुरू होत्या. त्यांच्या विरोधात ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीने पेडणे पोलिस, पेडणे उपजिल्हाधिकारी, स्थानिक आमदार यांना संदेश पाठवून त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत, अशी माहिती देण्यात आली. पेडणे पोलिसांनी मारबेला रिसॉर्टवर 163/2022 पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे 15 आणि ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम 2000 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस बघ्याच्या भूमिकेत

काही ठिकाणी संगीत रजनी सुरू असताना पोलिस बघ्याची भूमिका घेत होते, असा आरोप नागरिकांनी केला. तसेच न्यू वाडा मोरजी येथे पहाटे 5 वाजता स्थानिकांनी संगीत रजनीचे आयोजन केले होते. त्यातील काही युवकांकडे संपर्क साधला असता, आपले नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की न्यायालयाने रात्री 10 वा. नंतर संगीत रजनी बंद करण्याचा आदेश दिला आहे. परंतु आम्ही रात्री पार्टी आयोजित केली नाही. आम्ही ती पहाटे सुरू केली. त्यामुळे आदेशाचे उल्लंघन झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

लाखो रुपयांची उलाढाल

अशा संगीत रजनी विरोधात कोणी आवाज उठवला तर त्यांना धमक्या दिल्या जातात, असे नागरिकांचे म्हणणे आहे. अशा रजनीमध्ये लाखोंची उलाढाल होत असते. त्यामुळे विरोधात उभे राहणार्‍यांची तोंडे बंद केली जातात. शिवाय लोकप्रतिनिधी, पोलिस यांना हाताशी धरून दबाव टाकला जातो, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
कठोर कारवाई होणे आवश्यक : शहापूरकर
ध्वनी प्रदूषण नियंत्रण समितीचे सदस्य प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले की रात्री 10 वा. नंतर सुरू असणार्‍या संगीत रजनींवर अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. आयोजकांवर गुन्हे नोंदवून त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

हणजूण, कळंगुट किनारेही झाले शांत

म्हापसा : मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रात्री दहानंतर संगीत वाजविण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. त्याची अंमलाबजावणी हणजूण व कळंगुट पोलिसांनी सुरू केली आहे. त्यामुळे रात्री दहानंतर कर्णकर्कश संगीत बंद झाले आहे. हणजूण पोलिसांनी नियंत्रण ठेवण्यासाठी विविध भागांकरिता चार तुकड्या तयार केल्या आहेत. या तुकड्या रात्री किनारी भागात लक्ष ठेवणार असल्याचे हणजूण निरीक्षक प्रशाल देसाई यांनी सांगितले. कळंगुट किनार्‍यावर कळंगुट पोलिसांकडून रात्रीची गस्त वाढवल्याची माहिती निरीक्षक दत्तगुरू सावंत यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT