Latest

गोपीचंद पडळकर म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेजमध्ये बोगस प्रवेश

Arun Patil

खटाव ; पुढारी वृत्तसेवा : मायणी, (ता. खटाव) येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल या मेडिकल कॉलेजच्या तत्कालीन व्यवस्थापनाने 2010 ते 2012 दरम्यान बोगस प्रमाणपत्रे तयार करून विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचा खळबळजनक आरोप आ. गोपीचंद पडळकर यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केला. बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेऊन डॉक्टर झालेले विद्यार्थी आज रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत.

सातारा पोलिसांत या घटनेची सहा महिन्यांपूर्वी पुराव्यासह तक्रार करूनही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. गृहराज्यमंत्र्यांनी इतक्या गंभीर प्रकरणात दिरंगाई करणार्‍या पोलिस अधिकार्‍यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणीही आ. पडळकरांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सभागृहात बोलताना आ. गोपीचंद पडळकर म्हणाले, मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा म्हणून लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. विद्यार्थ्यांचे पालक आयुष्यभर काबाडकष्ट करून पै-पै जमा करून आपला पाल्य डॉक्टर होण्याचे स्वप्न पहातात. मात्र, काही संस्था पैसे घेऊन बोगस कागदपत्रांच्या आधारे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.

सातारा जिल्ह्यातील मायणी येथील रुरल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर या मेडिकल कॉलेजमध्ये 2010, 11 आणि 12 साली बोगस कागदपत्रे तयार करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. ज्या विद्यार्थ्यांनी सातारा, सांगली जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील बारावीची परीक्षा दिली त्या विद्यार्थ्यांचे नागपूर, गोंदिया परिसरात अस्तित्वातच नसलेल्या महाविद्यालयाच्या नावाने गुण वाढवून कागदपत्रे तयार करण्यात आली.

यामध्ये बोगस मार्कलीस्ट, मायग्रेशन आणि लिव्हिंग सर्टीफिकेट्स तयार करण्यात आली. या कामासाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे घेण्यात आले होते. कमी गुण मिळून आणि गुणवत्ता यादीत नसूनही बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश दिलेले विद्यार्थी आज डॉक्टर बनून जनतेच्या जीवाशी खेळत आहेत.

आ. पडळकर पुढे म्हणाले, मायणी मेडिकल कॉलेजमधील बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश प्रकरणी सातारा जिल्हा पोलिसात महादेव देशमुख, चंद्रकांत देशमुख आणि नागपूर येथील या प्रकरणाचा मास्टर माईंड गुहा नामक व्यक्ती विरोधात पुराव्यासह तक्रार करुनही सहा महिन्यात कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. इतक्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी सहभागी दोषींवर कारवाई न केल्याने विविध शंका येत आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तडजोड केल्याचा आरोप करत पडळकरांनी त्या अधिकार्‍यांना सस्पेंड करावे, अशी मागणी केली.

वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी लाखो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात. पालक मोठा खर्च करुन विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीतून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न करतात, मात्र बोर्डाचे बोगस मार्कलीस्ट आणि प्रमाणपत्र बोगस बनवून कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना मायणी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश दिला गेल्याचा आरोप आ. पडळकरांनी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुराव्यासह तक्रार दाखल करुनही या प्रकरणातील तत्कालीन सहभागी दोषींवर कारवाई केली नसल्याने पोलिस अधिकार्‍यांना सस्पेंड करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT