Latest

गोकुळच्या 12 कोटींच्या तोट्याला जबाबदार कोण? : शौमिका महाडिक यांचा सवाल

backup backup

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा बचत करण्यासाठी मुंबई येथील पॅकिंगचा ठेका नवीन संचालक मंडळाने काढून घेऊन तो महानंद कंपनीला दिला होता. मग आता अचानक पुन्हा महानंदकडून ठेका काढून इग्लू कंपनीला का दिला, याचा खुलासा संचालक मंडळाने करावा, असे पत्रक गोकुळच्या संचालक शौमिका महाडिक यांनी दिले आहे.

महानंदला ठेका दिल्याने बचत होत होती, तर आता पुन्हा मग इग्लूला ठेका देऊन त्यांच्या मतानुसार नुकसान का करत आहेत? या निर्णयाने वर्षभरात झालेल्या जवळपास 12 कोटींच्या तोट्याची जबाबदारी कोणाची? ही रक्कम बचत करून दीपावलीला दूध उत्पादकांना 12 कोटी रुपये जास्त देता आले असते, पण जाणीवपूर्वक हे नुकसान केले. त्यामुळे आता आ. सतेज पाटील यांनीच त्या रकमेची भरपाई करावी आणि दूध उत्पादकांच्या हक्काचे पैसे परत करावेत.

एकीकडे चेअरमन महानंदला पॅकिंगचा ठेका देऊन कशी बचत केली हे सांगत होते आणि दुसरीकडे त्यांचे नेते सतेज पाटील यांनी विधिमंडळात, फक्त सहकार टिकावा म्हणून आम्ही तोटा सहन करून महानंदला पॅकिंग दिल्याचे सांगतात. किती हा विरोधाभास? आज मी फक्त प्रश्न विचारतेय, पण वेळ आल्यावर संघाचा तोटा करून तिथे पॅकिंग करून घेण्यात कोणाचे व्यक्तिगत हितसंबंध गुंतले होते हेही सांगेनच. यानिमित्ताने त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आला. वर्षभरात घेतलेल्या निर्णयांमुळे संघाचे किती नुकसान झाले आणि कोणा-कोणाचा व्यक्तिगत फायदा झाला याचा पुराव्यासह खुलासा लवकरच करेन. चोख कारभार केला असेल तर पत्रक काढून विषयाला बगल देण्यापेक्षा आ. सतेज पाटील व गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी समोरासमोर एका व्यासपीठावर यावे, असे आव्हान ही पत्रकाद्वारे महाडिक यांनी दिले आहे.

महानंदला ठेका दिल्यामुळे गोकुळची बचतच झाली आहे, पण महानंदच्या प्रशासनात निर्माण झालेल्या विस्कळीतपणामुळे हा निर्णय घ्यावा लागला.
विश्वास पाटील,
अध्यक्ष, गोकुळ संघ

SCROLL FOR NEXT