Latest

गॅस दरवाढीचा भडका; केंद्राकडून ६२ टक्के वाढ, सीएनजी, पाईपगॅस महागणार

अमृता चौगुले

पेट्रोल आणि डिझेल दरवाढीत जनता रोज होरपळत असतानाच या महागाईत केंद्र सरकारने आणखी गॅस दरवाढीचा भडका उडवला. केंद्राने नैसर्गिक वायूचा दर तब्बल 62 टक्क्यांनी वाढवल्यामुळे मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस (पीएनजी) आणि वाहनांसाठीचा सीएनजी 10 ते 11 टक्के महागणार आहे. या निर्णयासोबतच पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत शुक्रवारपासूनच 43 रुपयांची वाढ केल्याने हॉटेलचालकांना मोठा दणका बसला आहे.

केंद्राच्या या निर्णयामुळे तीन पातळ्यांवर महागाईचा भडका उडू शकतो. स्वयंपाकासाठी वापरला जाणारा पीएनजी अर्थात पाईप गॅस महाग होईल. अलीकडे मोठ्या प्रमाणात सीएनजीवरील वाहने मुंबईसह महाराष्ट्रात धावतात. या वाहनांचा गॅसही महागणार. गॅसवर आधारित कारखान्यांचे खतही महाग होऊ शकते. त्याचबरोबर गॅसआधारित वीजनिर्मिती प्रकल्पांनाही वीजदर वाढवावे लागतील. यातील पीएनजी आणि सीएनजीचे दर सरळ 10 ते 11 टक्के वाढतील आणि ओघानेच मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये प्रवास महाग होईल.

केंद्र सरकारने एप्रिल 2019 नंतर प्रथमच नैसर्गिक वायूची दरवाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढत्या दरांचे कारण केंद्राने दिले आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) सध्या 6 हजार कोटी रुपयांच्या प्रचंड तुटीत आहे. ती तूट भरून काढण्यासाठीच केंद्राने गॅसचा भडका उडवला असे मानले जाते.

गॅस सिलिंडर महागल्याने हॉटेलच्या मेनू कार्डचे दरही भडकू शकतात. मागील महिन्यात एक सप्टेंबर रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 75 रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता त्यात पुन्हा महिनाभरातच वाढ करण्यात आली आहे. वाढीव दरानंतर मुंबईत 19 किलो व्यावसायिक सिलिंडरसाठी आता 1685 रुपये मोजावे लागणार आहेत.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती ऑगस्टमध्येही दुपटीने वाढल्या होत्या. इंडेनच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर किमतीत 2021 मध्ये आतापर्यंत एकूण 404.50 रुपयांची वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत प्रति व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1332 रुपये होती. अवघ्या 9 महिन्यांत ती वाढत जाऊन 1736.50 रुपयांवर पोहोचली आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी स्तरावर

नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी शुक्रवारी इंधन दरात पुन्हा वाढ केली. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात 25 पैशांची, तर डिझेलच्या दरात 30 पैशांची वाढ केली आहे. यानंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर 101.89 रुपयांवर, तर डिझेलचे दर 90.17 रुपयांवर गेले आहेत. गेल्या तीन आठवड्यांच्या कालावधीत पेट्रोल दरात झालेली ही तिसरी वाढ असून डिझेल दरात झालेली सहावी वाढ आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचे प्रतिलिटरचे दर आता 107.95 रुपयांवर, तर डिझेलचे दर 97.84 रुपयांवर गेले आहेत.

  • स्वयंपाकाचा पाईप्ड गॅस 10 ते 11% म्हणजे युनिटमागे 2.50 रु. ते 2.70 रु. महाग होणार
  • वाहनांसाठीचा सीएनजी प्रतिकिलो 4.50 रु. ते 4.70 रुपयांनी महाग होणे शक्य.
  • गॅसआधारित कारखान्यांची खते आणि वीजही महागण्याची शक्यता

हॉटेल महागणार : व्यावसायिक सिलिंडर दरात सतत वाढ होत असल्याने रेस्टॉरंटस्, हॉटेल्स, धाबे आणि बेकरी उत्पादनांसह इतर खाद्यांच्या दरात वाढ होणार आहे. साहजिकच ग्राहकांच्या खिशाला चाट बसणार आहे. त्यातही राज्यांचे कर वेगवेगळे आहेत. त्यामुळे महागाईच्या आगीत आणखी तेल ओतले जाणार आहे.

SCROLL FOR NEXT