सांगली : पुढारी वृत्तसेवा
विविध कारणाने लावण्यात येणार्या डिजिटल फलकाची परवानगी घेण्यात यावी. त्यावर समाजकंटक, तडीपार, गुन्हेगार व्यक्तीचे छायाचित्र लावण्यात येऊ नये, अशा सूचना पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी येथे दिल्या. शहरातील डिजिटल बोर्ड, फ्लेक्स, बॅनर, स्टीकर आदी वस्तू तयार करणार्या व्यावसायिकांची बैठक झाली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या.
यावेळी महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सांगली ग्रामीणचे शिवाजी गायकवाड, विश्रामबाग ठाण्याचे एस. के. पुजारी, संजयनगर ठाण्याचे संजय क्षीरसागर आदी उपस्थित होते. श्री. टिके म्हणाले, फलक तयार करताना संबंधित विभागाकडून परवानगी असल्याखेरीज छपाई करू नये अथवा लावण्यात येवू नये.
परवानगी दिलेल्या मजकुरापेक्षा वेगळा मजकूर असू नये. कोणत्याही धर्माच्या, जातीच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी. वाहतूक शाखेने घालून दिलेले नियम व अटीची कोटेकोरपणे अंमलबजावणी करावी. वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी. फलकाबाबतच्या संदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, उच्च न्यायालयाच्या नियमाचे पालन करावे. महापालिकेने दिलेल्या परवान्याची एक प्रत पोलिस ठाण्यात द्यावी. फलक तयार करणार्याचे नाव, परवानगी दिलेल्याचा तपशील नंबर लिहिलेला असावा. आयुक्तांनी घातलेल्या नियम व अटीचे पालन करावे. या अटींची पूर्तता केल्यानंतर पोलिस ठाण्याकडून नाहरकत दाखला देण्यात येईल.
शहरात गेल्या काही दिवसात विविध कारणाने मोठ्या प्रमाणात डिजिटल फलक लावण्यात आले होते. त्यातील अनेक फलकांची परवानगी घेतलेली नव्हती. त्याशिवाय विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची छायाचित्रे या फलकावर झळकत होती. त्याची दखल घेत प्रशासनाने बैठक घेऊन या सूचना दिल्या आहेत.