Latest

गिनिज बुक ची अशी झाली सुरुवात…

अमृता चौगुले

लंडन ः 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्' या जागतिक विक्रमांची नोंद करणार्‍या पुस्तकाचा शुक्रवारी 66 वा वर्धापन दिन साजरा झाला. कोणताही विक्रम झाला की लोकांच्या मनात आधी हेच येते की त्याची गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे का? या जगप्रसिद्ध रेकॉर्ड बुकची वाटचालही एखाद्या विक्रमासारखीच रंजक व अनोखी आहे.

27 ऑगस्ट 1955 या दिवशी गिनिज बुक पहिल्यांदा प्रकाशित झाले. मात्र, त्याची कहाणी सुरू होते 1950 च्या दशकापासून. आयर्लंडमध्ये गिनिज ब—ेवरी कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर सर ह्यूज बीवर आपल्या मित्रांसमवेत पक्ष्यांची शिकार करीत होते. त्याचवेळी त्यांच्या नजरेसमोरून पक्ष्यांचा एक अतिशय मोठा थवा वेगाने उडत गेला. इतक्या वेगाने उडणारे हे कोणते पक्षी आहेत असा प्रश्‍न ह्यूज आणि त्यांच्या मित्रांना पडला.

प्रत्येकजण वेगवेगळी उत्तरे देऊ लागला आणि कोणते उत्तर बरोबर आहे हे समजून घेण्यासाठी कुठला मार्ग नव्हता! ह्यूज आणि त्यांच्या मित्रांनी काही पुस्तकेही चाळली; पण त्यांना हवी ती माहिती मिळाली नाही. त्यावेळी ह्यूज यांच्या मनात आले की एक असे पुस्तक असावे ज्यामध्ये सर्व प्रकारची माहिती असेल. 1954 मध्ये ह्यूज यांनी ही संकल्पना नोरिस आणि रोस नावाच्या जुळ्या भावांना सांगितली. हे दोघे लंडनच्या एका 'फॅक्ट फाइंडिंग एजन्सी'त काम करीत होते. त्यांना ही संकल्पना आवडली आणि गिनिज बुकवर काम सुरू झाले.

लंडनच्या फ्लीप स्ट्रिटवरील एका जुन्या व्यायामशाळेचे रूपांतर कार्यालयात करण्यात आले आणि अशाप्रकारे दोन खोल्यांचे ऑफिस थाटले! 27 ऑगस्ट 1955 या दिवशी पहिले पुस्तक प्रकाशित झाले. 198 पानांचे हे पुस्तक इतके लोकप्रिय झाले की डिसेंबरपर्यंत ते बि—टनमध्ये सर्वाधिक विक्री होणारे (बेस्ट सेलर) पुस्तक ठरले. पुढील वर्षी ते अमेरिकेतही प्रकाशित करण्यात आले. 1960 पर्यंत या पुस्तकाच्या 5 लाख प्रती विकल्या गेल्या. त्यानंतर जगातील वेगवेगळ्या भाषांमध्ये हे पुस्तक प्रकाशित केले जाऊ लागले. आज शंभरपेक्षा अधिक देशांमधील 37 वेगवेगळ्या भाषांमध्ये गिनिज बुक प्रकाशित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT