Latest

गाणी, गप्पा, कलाविष्कार अन् हास्यकल्लोळही

निलेश पोतदार

वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी उडविलेल्या राजकीय फुलबाज्या, आपल्या वडिलांचे सांगितिक संस्कार उलगडत लिटिल चॅम्प कार्तिकी गायकवाडने गुणगुणलेली गीते, टिल्लू-हल्याळ-धामणकर या त्रिकुटाचा हास्य-काव्यफराळ, संस्कृती बालगुडेचा नृत्यप्रवास, शशिकांत पेडवाल यांनी हुबेहूब साकारलेले अमिताभ बच्चन, अभ्यंकर-दामलेंनी केलेला शांताबाई शेळक्यांच्या गीत-कवितांचा जागर, कडाडणार्‍या डफाच्या साथीने हेमंत मावळे यांनी सादर केलेले वीरश्रीयुक्‍त पोवाडे…

'पुढारी ऑनलाईन दीपोत्सव' यंदा अशा भरगच्च कार्यक्रमांनी भरला आहे. कार्यक्रम नव्हे, तर साहित्य-काव्य-गायनाचा हा बहुढंगी फराळच राज्यातील रसिकांसमोर 'पुढारी'ने सादर केला आहे. 1 नोव्हेंबरच्या वसुबारसपासून सुरू होणारी ही मैफल सहा नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या कलाफराळाचा आनंद दै. 'पुढारी'च्या फेसबुक पेजवर घेता येणार आहे.

या सांस्कृतिक मेजवानीत काय काय आहे ते पाहू.

1 नोव्हेंबर : वसुबारसला महाराष्ट्राची शाहिरी परंपरा…

शाहीर हेमंत मावळे आणि साथीदार पोवाड्यांनी इतिहासात नेतील. त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या पत्नी संगीता, चिरंजीव होनराज अन् त्यांचे वादक सहकारी. ज्ञानेश्‍वरीतील पोवाड्याच्या उल्लेखापासून मावळे सुरुवात करतील. त्यानंतर शिवकाळ, पेशवेकाळ, स्वातंत्र्यसमर अन् संयुक्‍त महाराष्ट्राची चळवळ यांना जिवंत करणार्‍या पोवाड्यांपर्यंतची सफर ते घडवतील.
(सकाळी 11 वाजता)

2 नोव्हेंबर : धनत्रयोदशीला डीजे श्रेयाची धमाल…

आजर्‍यासारख्या छोट्याशा गावातून येऊन डीजे बनलेल्या श्रेयाकडून आपण ऐकणार आहोत तरुणांना भुरळ घालणार्‍या पाश्‍चात्त्य अन् आधुनिक संगीताच्या क्षेत्राबद्दल. (सकाळी 11 वाजता)

3 नोव्हेंबर : 'दमां'चे खुमासदार किस्से…

दिवंगत ज्येष्ठ विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचे खुमासदार किस्से अन् त्यांच्या कथांचे काही भाग सादर करणार आहेत लेखक श्याम भुर्के आणि त्यांच्या पत्नी गीता. माझी पहिली चोरी, व्यंकूची शिकवणी अशा बहारीच्या कथांचे सार ऐकायला मिळेल. (सकाळी 11 वाजता)

4 नोव्हेंबर : नरकचतुर्दशी-लक्ष्मीपूजनास

कार्तिकी गायकवाड अन् हास्य-काव्यफराळ…
धमाल एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू, दिलीप हल्याळ अन् मंजिरी धामणकर यांनी सादर केलेले किस्से, मराठी-उर्दू शेरोशायरी यांत आपण गुंगून जाणार आहोत.
(सकाळी 11 वाजता)

त्याच दिवशी लिटिल चॅम्प फेम कार्तिकी गायकवाड वडील कल्याणजी यांच्यासोबत उलगडणार आहे तिचा सांगितिक प्रवास. वडिलांनी संगीताचे संस्कार कसे केले हे ती सांगेल. आपल्या मुलीला आपण कसे घडवले ते कल्याणजी सांगतील. तसेच कार्तिकी गीतेही पेश करील. (संध्याकाळी 7 वाजता)

5 नोव्हेंबर : पाडव्याला साक्षात

बच्चन अन् संस्कृती बालगुडे ज्यांचे फोटो पाहून ते आपलेच फोटो आहेत, असा भास खुद्द अमिताभ बच्चन यांनाच झाला अन् ते फोटो आपले नाहीत, हे समजल्यावर त्यांनी न राहवून जया अशी हाक मारून पत्नीला बोलावून घेतले असे शशिकांत पेडवाल समोर येतील. 'अग्‍निपथ'सारख्या कविता, दीवार-सिलसिला चित्रपटांतील संवाद, गाणी यांनी ते धमाल उडवून देतील. (सकाळी 11 वाजता).
त्याच दिवशी तरुणांच्या दिलाची धडकन अन् नृत्यबिजली शोभावी अशा संस्कृती बालगुडेशी गप्पा मारणार आहोत. (संध्याकाळी 7 वाजता)

6 नोव्हेंबर : भाऊबीजेला फुटाणेंच्या तडतड्या अन् शांताबाईंच्या कविता

ज्येष्ठ कवी-वात्रटिकाकार-निर्माते रामदास फुटाणे बालपणापासूनचा प्रवास कथन करतील अन् ते करतानाच सामना-सर्वसाक्षी या चित्रपटांची निर्मिती, राजकीय प्रसंगावरील वात्रटिकांनी मुलाखतीत रंगत आणतील. (सकाळी 11 वाजता)

ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. बालगीते-कोळीगीते-प्रेमगीते-भक्‍तिगीते असा विविधांगी साहित्यठेवा असलेल्या शांताबाईंच्या रचना सादर करणार आहेत चैत्राली अभ्यंकर आणि स्नेहल दामले. जिवलगा, ही वाट दूर जाते, किलबिल-किलबिल पक्षी बोलती, यांसारखी गीते ऐकणार आहोत. (संध्या. 7 वा.)

SCROLL FOR NEXT