Latest

गर्भाशयाला कॅन्सरचा धोका; वेळेत निदान केल्यास मात शक्य

Arun Patil

कोल्हापूर ; एकनाथ नाईक : 'पॅपस्मिअर' चाचणीबाबत महिलांमध्ये भीती आणि अज्ञान असल्याने राज्यातील महिलांमध्ये दिवसेंदिवस गर्भाशय कॅन्सरच्या प्रमाणात वाढ होत आहे. महिलांमध्ये आढळणारा दुसर्‍या क्रमांकाचा हा कॅन्सर आहे. पॅपस्मिअर चाचणी अभावी कर्करोग थेट तिसर्‍या -चौथ्या टप्प्यात गेल्यानंतर रुग्ण उपचारसाठी येत असल्याने त्यांचा आजार बरा करण्याचे मोठे आव्हान असते. त्यामुळे वेळीच आजाराचे निदान होण्यासाठी पॅपस्मिअर चाचणीसोबत एचपीव्ही डीएनए चाचणी महत्त्वाची आहे, अशी माहिती कॅन्सरतज्ज्ञांनी दै.'पुढारी' शी बोलताना दिली.

गर्भाशयाच्या मुखाचा, गर्भाशयाचा कॅन्सर यापूर्वी 30 वर्षांवरील महिलांमध्ये आढळून येत होता. सध्या हा आजार विशीतील तरुणींमध्ये आढळू लागला आहे. 30 ते 45 वयोगटातील लैंगिकद‍ृष्ट्या सक्रिय असलेल्या महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर आढळून येतो. पण तरुण वयात लैंगिकद‍ृष्ट्या सक्रिय झालेल्या मुलींना हा आजार होण्याचा धोका वाढला आहे. गर्भधारणेचे प्रमाण जास्त असणे, कमी वयात लैंगिक संबंध राखणे, हॉर्मोनल गर्भनिरोधकांचा दीर्घकाळ वापर, तंबाखूचा वापर, अस्वच्छता आणि अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण कमी असलेला आहार यामुळे हा आजार होतो.

गर्भशयाचा कॅन्सर टाळण्यासाठी पॅपस्मिअर ही चाचणी प्रत्येक वर्षी करावी, असे वर्ड हेल्थ ऑर्गनायझेन यांनी सूचित केले आहे. पॅपस्मिअर, एचपीव्ही डीएनए चाचण्यांमधून आजाराचे योग्य वेळेत निदान होते. त्यामुळे उपचार करणे शक्य होते. महिलांमध्ये होणार्‍या कॅन्सरमध्ये 16 ते 17 टक्के गर्भाशयाच्या कॅन्सर होतो. कर्करोगामुळे होणार्‍या एकूण मृत्यूपैकी 10 टक्के प्रमाण गर्भाशयाच्या कॅन्सरचे आहे. एखाद्या महिलेला 'एचपीव्ही ' विषाणूचा संसर्ग झाल्यास गर्भाशयाच्या कॅन्सर होण्यास काही वर्षे लागतात.

योग्य वेळी निदान झाल्यास 99 टक्के महिला एचपीव्ही संसर्गातून मुक्‍त होतात. पॅपस्मिअर चाचणी न झाल्यास रुग्ण थेट तिसर्‍या किंवा चौथ्या टप्प्यात उपचारास येतात तेव्हा हा आजार गंभीर अवस्थेत असतो. भारतात गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लसी बाजारात आल्या आहेत. या लसी रुग्णांना आधारवड ठरतील, अशी माहिती कॅन्सर तज्ज्ञ डॉ. रेश्मा पवार यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT