कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा : गर्भलिंग निदान करणार्या डॉक्टरचा पर्दाफाश 'अंनिस'च्या टीमने केला. पन्हाळा तालुक्यातील हर्षल नाईक, उमेश पोवार नावाचे डॉक्टर आता गजाआड होतील. गर्भलिंगनिदान आणि स्त्री भ्रूणहत्या करणार्यांचे मोठे रॅकेटच यातून उद्ध्वस्त झाले. एकविसाव्या शतकातही महिलेला गर्भात मारणारी मानसिकता आजही जिवंत आहे. स्टिंग ऑपरेशन फत्ते करणार्या 'अंनिस' व जिल्हा शल्य चिकित्सकांच्या टीममधील सहकारी यांनी सांगितला त्यांचा अनुभव आणि विचार कोलाहल!
पडळ गावात बोगस डॉक्टर अवैध गर्भलिंग निदान चाचणी, गर्भपात करत असल्याची महिती 'अंनिस'ला मिळाली. त्यानुसार पीडित गर्भवती महिला म्हणून कॉन्स्टेबल, तिचा पती म्हणून सीपीआरचे आरोग्य विस्तार अधिकारी आणि मुलीची मावशी म्हणून समाजसेविका गीता हासूरकर यांची टीम बनवत डॉक्टरला पकडण्यासाठी सापळा रचला. आणि जवळपास चार तासांच्या स्टिंग ऑपरेशनमधून दोन बोगस डॉक्टरांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले.
'अंनिस'ला बोगस डॉक्टरांची माहिती मिळाली. त्यानुसार प्राथमिक चौकशी करण्यासाठी 'अंनिस'ची स्टिंग ऑपरेशनसाठीची टीम डॉक्टरांकडे मंगळवार, दि. 5 रोजी तपासणीसाठी गेली. पीडितेला चार वर्षांची मुलगी असून दुसर्या वेळी गोळी घेऊन गर्भपात झाल्याची माहिती दिली. आताही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात करायचा आहे. सासरच्या मंडळींकडून त्रास होत असल्याची बतावणी केली.
एजंटसह डॉ. नाईक यांची खात्री पटली. दुसर्या दिवशी बुधवारी दुपारी साडेतीन वाजता गीता हासूरकर यांना एजंटचा फोन आला, 'डॉक्टर तयार आहेत. 25 हजार खर्च येईल. तुमच्या भाचीला पडळ गावच्या कमानीजवळ घेऊन या,' असा निरोप मिळाला. त्यानंतर टीम तयार करून रात्री 8 वाजता तिघेजण पडळच्या नियोजित ठिकाणी रिक्षातून पोहोचले.
एजंटने एका क्लिनिकच्या वरच्या मजल्यावर त्यांना नेले. तिथे आधीपासूनच डॉ. हर्षल नाईक वाट पाहत होते. त्यांनी सांगितले की, उपचार दुसरे डॉक्टर करणार आहेत. मग, पुन्हा रिक्षातूनच या तिघांसोबत डॉक्टरही कोल्हापूरमधील अंबाई टँक परिसरात रात्री साडेदहाच्या सुमारास गेले. दरम्यान, डॉ. नाईक यांनी गर्भपात करणारे डॉ. उमेश पोवार यांना तिथे येण्यास सांगितले
होते.
रंकाळा परिसरात आल्यानंतर डॉ. पोवार यांनी रुग्ण आणि नातेवाईकांची चौकशी केली आणि त्यांच्याकडून प्राथमिक स्वरूपात पाच हजार रुपये घेतले. आपल्या घरी नेऊन पीडितेला गोळ्या दिल्या अन् 48 तासांनंतर पिशवीचे तोंड उघडेल, तेव्हा माझ्याकडे यायचे, असे सांगितले.
दरम्यान, पोलिसांचा छापा पडला आणि डॉ. पोवार यांच्या घरी गर्भपाताच्या गोळ्या, इंजेक्शन, सलाईन , गर्भपाताचे किट तसेच गर्भपातासाठी रूग्णांकडून घेतलेली रक्कम आढळली.