Latest

कोल्हापूर : गर्भलिंग निदान; डॉक्टरपत्नी ताब्यात

अमृता चौगुले

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

परिते (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान सेंटर प्रकरणी कागल तालुक्यातील डॉक्टरपत्नीचे नाव निष्पन्न झाले आहे. करवीर पोलिसांनी संशयित महिलेला रविवारी सकाळी ताब्यात घेतले. ही महिला वैद्यकीय तपासणीत कोरोनाबाधित आढळल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची संख्या आता 11 झाली आहे. रविवारी ताब्यात घेण्यात आलेली महिला ही मुख्य संशयित राणी कांबळेची विश्वासू साथीदार होती. कागल तालुक्यातील स्वत:च्या घरात राणी कांबळे हिच्या मदतीने गर्भवती महिलांची सोनोग्राफी मशिनद्वारे तपासणी करण्यात येत होती, अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली.

करवीर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी गर्भलिंग निदान सेंटर प्रकरणातील महिलेला रविवारी सकाळी कागल तालुक्यातील तिच्या गावातून ताब्यात घेतले. दुपारी पोलिस ठाण्यात आणून चौकशी सुरू असताना तिला खोकल्याचा त्रास सुरू झाला. शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  त्यात ही महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल उपलब्ध झाला.

परितेतील सेंटरमध्ये 210 गर्भवती महिलांची तपासणी

संशयित राणी कांबळे, महेश पाटीलसह अन्य साथीदारांनी बेकायदेशीर सुरू केलेल्या गर्भलिंग निदान सेंटरमध्ये अलीकडच्या काळात 210 गर्भवतींची सोनोग्राफी मशिनद्वारे गर्भलिंग चाचणी केल्याची माहिती चौकशीत उघडकीस आली आहे. संबंधित महिलांसह त्याच्या पतींचेही जबाब घेण्यात येत आहेत. रॅकेटमध्ये आणखी काही संशयितांची नावे उघड होण्याची शक्यता आहे, असेही राळेभात यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT