Latest

गणेश नाईक यांच्या जामिनावर आज निर्णय

Arun Patil

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ऐरोली मतदार संघाचे आमदार गणेश नाईक यांच्यावरील बलात्कार आणि रिव्हॉल्वर दाखवून महिलेस धमकावण्याच्या गुन्ह्यांतील अटकपूर्व जामिनावर गुरुवार दि. 28 एप्रिल रोजी निर्णय होणार आहे.

या प्रकरणी बुधवारी ठाणे न्यायालयाचे न्या. एन. के. ब्रम्हे यांच्यासमोर सुनावणी झाली. नाईक यांची वैद्यकीय तपासणी करायची असल्याने तसेच गुन्ह्यातील रिव्हॉल्वर जप्त करायचे असल्याने त्यांना पोलीस कोठडी आवश्यक आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यावर नाईक डीएनए चाचणी करण्यास तयार आहेत. तसेच गुन्ह्यांतील रिव्हॉल्वरदेखील देण्यास तयार आहेत असे नाईक यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

दोन्ही गुन्ह्यांमध्ये गणेश नाईक यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या दोन्ही प्रकरणी 27 एप्रिलला एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती नाईक यांच्या वकिलांनी यापूर्वी न्यायालयात केली होती. ही सुनावणी ठाणे न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राजेश गुप्ता यांच्या न्यायालयात होणार होती. मात्र, बुधवारी अचानक ही सुनावणी न्यायमूर्ती एन. के. ब्रम्हे यांच्या न्यायालयात घेण्यात आली. दोन्ही बाजूने सुमारे साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला.

या गुन्ह्यातील सर्व आरोप निराधार असून महिलेच्या संमतीने संबंध ठेवण्यात आले होते, म्हणून त्यास बलात्कार मानू नये असा युक्तिवाद देखील नाईक यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. या युक्तिवादावर पीडित महिलेच्या वकिलांनी आक्षेप घेतला. 2010 ते 2017 या काळात नाईक महिलेच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करीत होते असे पीडितेच्या वकिलांनी न्यायालयासमोर सांगितले.

तक्रार मागे घ्यावी यासाठी सध्या फिर्यादीवर दबाव आणला जात असून दोन वेळा नातेवाईकांमार्फत त्यांना धमकी देण्यात आली आहे, त्याबाबत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे फिर्यादीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. दोन्हीकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणी गुरुवारी अंतरिम निर्णय देऊ, असे न्यायालयाने सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT