Latest

‘गगनयान’ मोहिमेसाठी मिळाले क्रू मॉड्यूल

Arun Patil

नवी दिल्ली : भारत आता नव्या गगनभरारीसाठी दिमाखात सज्ज होत आहे. देशाची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम असलेल्या 'गगनयान'साठीची जय्यत तयारी सुरू आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था 'इस्रो'ला आता या मोहिमेच्या चाचणी उड्डाणासाठी पहिले सिम्युलेटेड क्रू मॉड्यूल (एससीएम) मिळाले. 'इस्रो'ने एका ट्विटद्वारे ही माहिती दिली.

या ट्विटमध्ये नमूद आहे की, 'इस्रो'ला 'गगनयान' प्रोजेक्टसाठी सिम्युलेटेड क्रू मॉड्यूल स्ट्रक्चर असेंब्ली मिळाली आहे. ही पहिली स्वदेशी 'एससीएम' असून, ती 'विक्रम साराभाई स्पेस सेंटर'ने विकसित केली आहे. तसेच ते मंजीरा मशीन बिल्डर्स प्रायव्हेटने तयार केले आहे. या मॉड्यूलचा वापर अनेक टेस्ट व्हेईकल मिशनसाठी केला जाईल. याअंतर्गत क्रू मॉड्यूलच्या अनेक उपप्रणालींच्या चाचणीसह क्रू एस्केप सिस्टमचे प्रमाणीकरण केले जाईल. तसेच क्रू एस्केप सिस्टम व इतर उपप्रणाली प्रमाणित करण्यासाठी टेस्ट रॉकेट मिशनमध्येही 'एससीएम'चा वापर केला जाईल.

'इस्रो'च्या मते, 'एससीएम' हे एक अनप्रेशराईज्ड क्रू मॉड्यूल आहे. ते आकार, बाह्य मोल्ड लाईन, पॅराशूट सिस्टम व वास्तविक चालक दल मिशन कॉन्फिगरेशनच्या 'पायरोस'सारख्या प्रमुख सिस्टमच्या इंटरफेसचे अनुकरण करते. 'इस्रो'ने सांगितले की, क्रू मॉड्यूल हे एक प्रेशराईज्ड कॅप्सूल आहे. त्या माध्यमातून 'गगनयान' मोहिमेसाठी अंतराळपटूंना प्रशिक्षण दिले जाते. 'इस्रो'ची चालू वर्षाच्या अखेरीस एक टेस्ट रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना आहे. सध्या 'गगनयान' मोहिमेसाठी चार भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू आहे.

SCROLL FOR NEXT