Latest

खेलो इंडिया पदक विजेत्यांची लाखाची उड्डाणे; बक्षिसाच्या रकमेत यंदापासून भरीव वाढ

मोहन कारंडे

सातारा : विशाल गुजर : खेलो इंडियात पदक विजेते खेळाडू आता मालामाल होणार आहेत. राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार सुवर्णपदक विजेत्यास तीन लाख, रौप्य दोन लाख व कांस्यपदक विजेत्यास एक लाख रुपये दिले जाणार आहेत. याचा महाराष्ट्रातील 161 खेळाडूंना लाभ होणार आहे. जिल्ह्यातील पदक विजेत्या 9 खेळाडूंनाही त्याचा लाभ होणार असून त्यांना 21 लाख रुपये बक्षिसाची रक्कम मिळणार आहे.

मध्यप्रदेश येथे झालेल्या पाचव्या खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. राज्यातील खेळाडूंनी 56 सुवर्ण, 55 रौप्य व 50 कांस्य अशी 161 पदकांची कमाई केली. पुणे, आसाम व हरियाणा येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. मध्यप्रदेश येथे एकूण 24 क्रीडा प्रकारांत स्पर्धा झाली. यापूर्वी खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या खेळाडूस 1 लाख, रौप्य पदक विजेत्यास 75 हजार व कांस्य पदक विजेत्यास 50 हजार रुपये दिले जात होते. त्यात बदल करत खेळाडूंना भरघोस बक्षिसे देण्याचा निर्णय राज्य शासनाने यंदापासून घेतला आहे. राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार सुवर्णपदक विजेत्यास तीन लाख, रौप्य पदक विजेत्यास दोन लाख व कांस्यपदक विजेत्यास एक लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील पदक विजेत्या खेळाडूंना भरीव लाभ होणार आहे.

खेलो इंडियात सातारा जिल्ह्यातील आदिती स्वामी हिने धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक व सांघिकमध्ये रौप्य अशी दोन पदक पटकावली असून तिला 5 लाख रुपये, श्रेया सपकाळ हिने मल्लखांब सांघिक प्रकारात रौप्यपदक मिळवले असून तिला दोन लाख रुपये मिळणार आहेत. प्रणाली पवार हिने मल्लखांब सांघिकमध्ये रौप्यपदक मिळवले असून तिला 2 लाख, अमृता चौगुले हिने ज्युदो खेळात 63 किलोवजन गटात रौप्य पदक मिळवले असून तिला 2 लाख, श्रुती गुळवे हिने मल्लखांब सांघिक प्रकारात रौप्य पदक मिळवले असून तिला दोन लाख, आकांशा बर्गे हिने मल्लखांबमध्ये रौप्य पदक पटकावले असून तिला दोन लाख, अस्मिता ढाणे हिने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक जिंकले असून तिला दोन लाख, रणवीर मोहिते याने मल्लखांबमध्ये रौप्य पदक मारले असून त्याला दोन लाख तर वेदांत शिंदे याने मल्लखांबमध्ये रौप्य पदक पटकावले असून त्याला 2 लाख रुपये मिळणार आहेत. भरघोस बक्षिसांमुळे खेळाला चालना मिळणार असून खेळाडूंनाही आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे.

जिल्ह्यातील खेळाडूंनी कमावली 10 पदके

खेलो इंडिया स्पर्धेत जिल्ह्याच्या खेळाडूंनी ठसा उमटवला आहे. जिल्ह्यातील सहभागी खेळांडूपैकी 9 खेळाडूंनी 10 पदके मिळवत सातार्‍याचा दबदबा राखला आहे. यामध्ये आदिती स्वामी हिने 1 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेत मुलींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्ह्याला 1 सुवर्णपदक, 9 रौप्य पदके मिळाली आहेत. जिल्ह्यातील खेळाडूंनी मल्लखांब, धनुर्विद्या, वेटलिफ्टींग आणि ज्युदो या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

खेलो इंडिया यूथ गेम्सने देशभरातील युवा खेळाडूंना क्रीडामंचक तयार झाले. जिल्ह्यातील युवा खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. क्रीडा विभागाने त्यांच्यावर बक्षिसांची लयलूट केली असल्याने यापुढे अनेक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होऊन जिल्ह्याचा नावलौकिक करतील.
– युवराज नाईक, जिल्हा क्रीडाधिकारी

SCROLL FOR NEXT