सोलापूर ः पुढारी वृत्तसेवा आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) व्यवहारात अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रिप्टोकरन्सी वापरताना परिपूर्ण माहिती घेऊन व काळजीपूर्वक गुंतवणूक करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) ही संकल्पना मूळ धरू लागली असून वेगाने प्रसार पावत आहे. याची सुरुवात 2009 मध्ये बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सी पासून झाली असून, आज इंटरनेटवर हजारो क्रिप्टोकरन्सी खरेदी-विक्री साठी उपलब्ध आहेत. त्यातच मागील काही वर्षांपासून यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवरती अनपेक्षित असा प्रचंड मोठा परतावा मिळाला असल्याने यामध्ये गुंतवणुकीचे प्रमाणही वाढत आहे. यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन-विविध वेबसाईट उपलब्ध आहेत.
कमी वेळात अधिक पैसा मिळवण्याच्या हव्यासापोटी वित्तीय संगणक माहितीगारांसोबतच सर्वसामान्य ज्यांना याबाबत पुरेसे ज्ञान नाही तेही यामध्ये गुंतवणूक करत आहेत. हव्यासापोटी पुरेशी माहिती न घेता ही जोखीम पत्करणार्यांकडे सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा वळवला असून, क्रिप्टोकरन्सी संबंधाने होणार्या फसवणुकीमध्ये वाढ होताना दिसत आहे. फसवे मोबाईल अॅप्लिकेशन्स, फसव्या वेबसाईटचा वापर करून सर्रासपणे फसवणूक केली जाते.
अतिशय कमी मुदतीत (जसे एक दिवस) मोठा परवाना (20 टक्क्यांहूनही अधिक) परतावा देण्याचे आमिष दाखवणारे ईमेल, एसएमएस टेलीग्राम-व्हॉट्स अॅप संदेश पाठवले जातात, ज्यासोबत एक लिंक पाठवली जाते. ही लिंक एखाद्या वेबसाईटवर घेऊन जाते किंवा एखादे अॅप डाउनलोड करते. त्यानंतर यामध्ये आपल्याला रक्कम गुंतवण्यासाठी सांगितली जाते. वेबसाईटची खात्री करण्यासाठी बर्याचदा वापरकर्ता थोडीशी रक्कम जमा करतो, अशा वेळी त्याला मुदतीत परतावादेखील मिळतो. त्यानंतर मग हाच वापरकर्ता अधिक मोठा परतावा मिळावा, म्हणून मोठी रक्कम जमा करतो परंतु त्याला परतावा किंवा मुद्दल दोन्ही मिळत नाही. पुढे त्याला जीएसटी, सर्विस चार्जेस, प्रोसेसिंग फी, वॉलेट कॅपॅसिटी वाढवण्यासाठीची फी अशी अनेक कारणे सांगून पैसे वसूल केले जातात व त्याची संपूर्ण फसवणूक होते.
मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या बाबतीत लिंक पाठवून मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी सांगितले जाते. त्यावर गुंतवणूक करण्यासाठी सांगितले जाते. अशावेळी वापरकर्ता हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करतो व रक्कम गुंतवतो. ऑटोमेटेड सिस्टिमचा वापर करून त्याने गुंतवलेल्या क्रिप्टोकरन्सीची किंमत वाढत असून त्याला आणखी रक्कम गुंतवण्यासाठी सांगितले जाते. अधिक रकमेच्या हव्यासापोटी मग वापरकर्ताही आणखी रक्कम जमा करतो. परंतु, ज्यावेळी तो ही रक्कम काढण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी विविध कारणे सांगून आणखी रक्कम जमा करण्यासाठी सांगून त्याची फसवणूक होते.
बिटकॉईन, इथरम इ. सारख्या क्रिप्टोकरन्सी मध्ये अतिशय काळजीपूर्वक व परिपूर्ण माहिती घेऊन मगच गुंतवणूक करावी. त्याचबरोबर प्रलोभनास बळी न पडता गुंतवणूकीसाठी यासंबंधातील विश्वासहार्य मोबाईल अॅप्लिकेशन्स व वेबसाईटचा वापर करावा. फसवणुकीचा प्रकार आढळल्यास सायबर सेलला तात्काळ संपर्क साधून माहिती द्यावी.
– सय्यद शौकत अली,
व.पो.नि.सायबर पो.ठा.
सोलापूर शहर