Latest

कोल्हापूरचा अनिकेत जाधव हैदराबाद एफसीकडून करारबद्ध

backup backup

युवा खेळाडूंचा समावेश असलेल्या इंडियन सुपर लीग संघ असलेल्या हैदराबाद एफसी संघाने आता कोल्हापूरच्या युवा खेळाडू अनिकेत जाधव याला देखील करारबद्ध केले आहे. हैद्राबाद क्लबने बुधवारी याची माहिती दिली. 21 वर्षीय हा अनिकेतने 2017 साली झालेल्या 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून खेळताना उल्लेखनीय कामगिरी केली होती.

आज अनिकेतने मानोलो मार्केझच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या हैदराबाद FC संघासोबत तीन वर्षांचा करार केला आहे.

'मी हैदराबाद क्लबच्या खेळाडू आणि कोचिंग स्टाफ सोबत काम करण्यास उत्सुक आहे. आयएसएलमधील अनेक चांगले तरुण खेळाडू हैदराबाद FC कडून खेळत आहेत. आता पुढील 3 वर्षे हैद्राबाद Fc साठी मी चांगली कामगिरी करेन. मी खूप आनंदी आहे आणि आता मी हैदराबाद एफसीकडून खेळण्याची आणखी वाट पाहू शकत नाही.' : अनिकेत जाधव

कोल्हापूरात जन्मलेल्या अनिकेतने आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात ही पुणे एफसी अकॅडमीसोबत केली. तो क्लबमध्ये तीन वर्षे होता आणि तिथे तो विविध वयोगटातील सामने खेळला. 2015 मध्ये त्याची निवड ट्रायलनंतर 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या शिबिरासाठी झाली.

राष्ट्रीय युथ संघासोबत चमक दाखवल्याने त्याला भारतात झालेल्या एएफसी 16 वर्षाखालील आणि 17 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास मिळाले.

हा खेळाडू दोन हंगामाकरता (2017-19) इंडियन एरॉज संघात होता. ज्यामध्ये त्याने आय लीगमध्ये 18 सामन्यात दोन गोल केले. त्यानंतर आयएसएल हंगामात त्याने जमशेदपूर एफसीकडून पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने दोन हंगामात 27 सामन्यात सहभाग नोंदवला. 2019 मध्ये या खेळाडूला ब्लॅकबर्न रोवर्सकडून त्यांच्या अकॅडमीमध्ये तीन महिने सराव करण्याची संधी मिळाली.

अनिकेत आमच्या संघात चांगली भर घालेल

मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ म्हणाले की, "तरुण खेळाडूंनी, विशेषत: अटॅकर्सनी नियमित खेळण्याची गरज आहे. परंतु संपूर्ण हंगामात उच्च पातळी राखणे त्यांच्यासाठी सोपे नाही. येथूनच संघात स्पर्धा महत्त्वाची असते आणि अनिकेत यामध्ये अगदी फिट बसतो. तो वेगवान आहे आणि कोणत्याही आक्रमक फळीत तो खेळू शकतो. आमच्या शैलीसाठी विंगर्स महत्त्वपूर्ण आहेत आणि मला खात्री आहे की अनिकेत आमच्या संघात चांगली भर घालेल.

अनिकेत अब्दुल रबीह आणि एरन डिसिल्वा या नवीन खेळाडूंसोबत मनोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसेल.यंदाच्या हंगामात हैदराबाद एफसी संघात रबीह आणि एरन शिवाय बार्थोलोम्यू ओगबेचे आणि एडु गार्सिया या खेळाडूंसह तो पाचवा नवीन खेळाडू आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूरची कुस्ती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT