Latest

कोल्हापूरचं आकाश आता अहोरात्र खुलं !

Arun Patil

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूरचं आकाश आता अहोरात्र खुलं राहणार आहे, यामुळे विकासाचे क्षितिजही उजळणार आहे. धावपट्टी विस्तारीकरण आणि नाईट लँडिंग यामुळे कोल्हापूरची विमानसेवा विस्तारणार असून कोल्हापूर हे राज्यातील नव्हे तर देशातील प्रमुख विमानतळ म्हणून हवाई नकाशावर येणार आहे.

छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूरद़ृष्टीतून 84 वर्षांपूर्वी कोल्हापूरचा विमानतळ सुरू झाला. विकासाची अनेक टप्पे पार करत आज 84 वर्षांनंतर कोल्हापूरच्या विमानतळाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नाईट लँडिंग सुविधेमुळे कोल्हापूरच्या विमानतळाचा विकास वेगाने होण्यास मदत होणार आहे. यामुळे कोल्हापूरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. कृषी, औद्योगिक, व्यापारासह पर्यटनालाही मोठी संधी मिळेल. परिणामी पिश्चिम महाराष्ट्रातील विकासाचे केंद्र ही कोल्हापूरची ओळख आणखी द़ृढ होण्यास मदत होणार आहे.

कोल्हापूर विमानतळाला प्रचंड संधी आहे. केंद्र शासनाच्या 'उडाण' योजनेतर्गंत कोल्हापुरात विमानसेवा सुरू झाल्यानंतर त्याचे प्रत्यंतर आलेच. कोरोनाच्या काळात कोल्हापूर 'उडाण' योजनेतील राज्यातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक करणारे विमानतळ ठरले. तीन वर्षांत कोल्हापूर विमानतळाने साडे तीन लाख प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. हे प्रमाण आणखी वाढण्यास आता या सुविधांमुळे मोठे बळ मिळणार आहे.

चार राजधानीच्या शहरांशी जोडणारे शहर

'उडाण' योजनेतर्गंत चार राज्यांच्या राजधानीशी हवाई मार्गाने कोल्हापूर जोडले आहे. हैदराबाद, अहमदाबाद, बंगळूर आणि मुंबई या राजधानीच्या शहरांशी कोल्हापुरातून विमानसेवा आहे. यापैकी सध्या बंगळूर आणि मुंबई या सेवा बंद आहेत. मात्र, दिवाळीपूर्वीच त्या पुन्हा सुरू होत आहेत.

कार्गो सेवाही सुरू होणार

कोल्हापुरात कार्गो सेवेला मंजुरी मिळाली आहे. प्रवासी विमानातूनच 500 किलोपर्यंत मालवाहतूक होणार आहे. भविष्यात कोल्हापुरातून स्वतंत्र कार्गो सेवाही सुरू होणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

मुंबई-पुण्यातील विमाने कोल्हापुरात येतील नाईट लँडिंग सुविधेमुळे मुंबई आणि पुण्यातील विमाने रात्री मुक्कामासाठी कोल्हापुरात येतील. यामुळे कोल्हापूरची विमानसेवा आणखी विस्तारली जाईल.

ही विमाने उतरतील

विस्तारीत 2300 मीटर धावपट्टीमुळे ए-320/200, एअर बस, बी-637-900 बोईंग यासारखी 150 ते 250 आसन क्षमतेची मोठी विमानेही उतरतील. सध्या मंजुरी मिळालेल्या धावपट्टीवर एटीआर 72 सह क्यू 400 बॉम्बड्रीयर यासारखीही विमाने उतरणार आहेत.

लवकरच नवी टर्मिनस इमारत

कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनस इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मार्च 2023 पर्यंत ही इमारत पूर्ण होईल. 3900 चौ.मी. क्षेत्र असलेल्या या इमारतीत 10 चेक इन काऊंटर, 8 सुरक्षा तपासणी कक्ष, 2 बॅगेज क्लेम कॅरूजल, 2 व्हीआयपी लाऊंज यासह 110 कार पार्किंगची सुविधा असणार्‍या या इमारतीसाठी 74 कोटींचा निधी खर्च केला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT